आशियाई कुस्ती : भारतीयांची सुवर्ण हॅटट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 02:36 IST2020-02-21T02:35:54+5:302020-02-21T02:36:37+5:30
आशियाई कुस्ती : दिव्या, पिंकी, सरिता यांचे वर्चस्व; निर्मलाचे रौप्य पदक

आशियाई कुस्ती : भारतीयांची सुवर्ण हॅटट्रिक
नवी दिल्ली : दिव्या काकरान गुरुवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून देणारी दुसरी भारतीय महिला मल्ल ठरली आहे. तिने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना चित केले. यामध्ये जपानची ज्यनिअर विश्व चॅम्पियन नरुहा मातसुयुकीचा केलेल्या पराभवाचाही समावेश आहे. दिव्याच्या या यशाचा जल्लोष सुरु असतानाच सरिता मोर (५९ किलो) आणि पिंकी (५५) यांनीही अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सुवर्णपदाकाला गवसणी घातली. त्याचवेळी, ५० किलो वजन गटात निर्मलाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दिव्याने शानदार कामगिरी करत पाच मल्लांच्या ६८ किलो वजन गटात आपल्या सर्व चारही लढती जिंकल्या. या गटात राऊंड रॉबिन पद्धतीने सामने झाले. नवज्योत कौर आशियाई अजिंयपदमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मल्ल ठरली होती. तिने २०१८ मध्ये किर्गिस्तानच्या बिशकेकमध्ये ६५ किलो वजनगटात जेतेपद पटकावले होते. यजमान मल्लांसाठी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला. चीनच्या मल्लांची अनुपस्थिती व जपानने आपल्या सर्वोत्तम मल्लांना न पाठविण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे आव्हान थोडे कमकुवत होते. दिव्याने ६८ किलो वजन गटात प्रथम कजाखस्तानच्या एलबिना कॅरजेलिनोव्हाचा पराभव केला. त्यानंतर तिने मंगोलियाच्या डेलगेरमा एंखसाइखानविरुद्ध सरशी साधली. डेलगेरमाविरुद्ध तिचा बचाव थोडा कमकुवत भासला, पण ती बाजी मारण्यात यशस्वी ठरली.
तिसऱ्या फेरीत दिव्याला उज्बेकिस्तानच्या एजोडा एसबर्जेनोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. या लढतीत तिने ४-० अशी आघाडी घेतल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला केवळ २७ सेकंदात नमवले. जपानच्या ज्युनिअर विश्व चॅम्पियनविरुद्धही दिव्याने ४-० अशी आघाडी घेतली होती. जपानच्या मल्लाने दुसºया टप्प्यात मजबूत सुरुवात करत दिव्याच्या डाव्या पायावर हल्ला केला, पण तिने गुण उजव्या पायावर आक्रमण करीत मिळवले. त्यामुळे लढत ४-४ अशी बरोबरीत झाली. मात्र, दिव्याने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याला चित केले आणि ती मॅटवरून बाहेर येऊन प्रशिक्षकांसह जल्लोष करू लागली. त्यानंतर रेफरीने अधिकृतपणे तिला ६-४ ने विजयी घोषित केले.
सरिता मोर हिने महिलांच्या ५९ किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत मंगोलियाच्या बातसेतसेगचा ३-२ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. २०१७ मध्ये ५८ किलो गटात रौप्यपदक पटकावल्यानंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणाºया सरिताने आपल्या पहिल्या दोन लढतींमध्ये कजाखस्तानच्या मदिना बाकरजिनोव्हा व किर्गिस्तानच्या नजीरा मार्सबेकजी यांचा तंत्राच्या आधारावर पराभव केला आणि त्यानंतर जपानच्या युमी कोनविरुद्ध १०-३ ने सरशी साधली.
पिंकीने ५५ किलो गट अंतिम लढतीत मंगोलियाच्या डुलगुन बोलोरमाला नमवत सुवर्ण जिंकले. पिंकीने अंतिम लढतीत बोलोरमाचा २-१ ने पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात सुवण पटकावणारी ती केवळ तिसरी भारतीय महिला ठरली. पिंकीने पहिल्या फेरीत उज्बेकिस्तानच्या शकिदा अखमेदोव्हाला चित केले, पण पुढच्या फेरीत ती जपानच्या काना हिगाशिकाव्हाविरुद्ध पराभूत झाली. पिंकीने त्यानंतर उपांत्य फेरीत मारिना जुयेवाचा ६-० ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
थोडक्यात हुकले यश
च्५० किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत जपानच्या मिहो इगारशीविरुद्ध निर्मलाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल २०१० ची रौप्यपदक विजेता निर्मलाला अंतिम लढतीत इगारशीविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला.
च्हरयाणाच्या निर्मलाने यापूर्वी मंगोलियाच्या मुंखनार
बयामबासुरेन हिचा ६-४ असा पराभव केला होता. यानंतर तिने उज्बेकिस्तानच्या दौलतबाइक यकशिममुरातोव्हाचा दक्ष तंत्राच्या आधारावर पराभव करुन आगेकूच केली होती.