Asian Games 2023 Hockey India vs Korea : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने गटात दमदार कामगिरी करताना ५ सामन्यांत ५८ गोल्सचा पाऊस पाडून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आज दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेतली. ९ वर्षानंतर भारतीय संघाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. त्यांच्यासमोर चीन किंवा जपान यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल.
भारताच्या नावावर आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीत ४ सुवर्ण, ११ रौप्य व ६ कांस्यपदकं आहेत. पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याचा पुरुष संघाचा प्रयत्न आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्येच २-० अशी आघाडी घेतली. हार्दिक सिंग ( ५ मि.) व मनदीप सिंग ( ११ मि.) यांनी हे गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये ललित उपाध्येयने गोल करून ही आघाडी ३-० अशी मजबूत केली, परंतु कोरियाकडून प्रतिवार झाला. मांजी जुंगने १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून आलेल्या चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. त्यानंतर २०व्या मिनिटाला मांजीने आणखी एक अप्रतितम गोल केला आणि पिछाडी २-३ अशी कमी केली.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघावर दडपण होते आणि कोरियाने त्यांच्या खेळाचा दर्जाही चांगला वाढवला होता. सामना संपायला ७ मिनिटांहून कमी कालावधी शिल्लक असताना अभिषेकने वेगवान रिव्हर्स फटका मारून भारतासाठी पाचवा आणि महत्त्वाचा गोल केला. साडेतीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना कोरियाने त्यांचा गोलरक्षक हटवला अन् एक अतिरिक्त खेळाडू मैदानावर उतरवला. भारताने हा सामना ५-३ असा जिंकला.