ना टाळ्यांचा कडकडाट, ना कॅमेऱ्यांचा गराडा; सुन्न स्टेडियममध्ये तिरंग्याकडे बघून रडणाऱ्या 'हर्डल क्वीन'चा VIDEO VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:18 IST2025-12-24T16:13:49+5:302025-12-24T16:18:16+5:30
रिकाम्या स्टेडियममध्ये पदक स्वीकारताना ज्योतीचे डोळे पाणावले

ना टाळ्यांचा कडकडाट, ना कॅमेऱ्यांचा गराडा; सुन्न स्टेडियममध्ये तिरंग्याकडे बघून रडणाऱ्या 'हर्डल क्वीन'चा VIDEO VIRAL
Jyothi Yarraji: कधीकधी विजयाचा जल्लोष करण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गरज नसते, तर कधीकधी टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा डोळ्यांतून वाहणारे अश्रूच खूप काही सांगून जातात. दक्षिण कोरियाच्या गुमी येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या ज्योती याराजीने १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पण आज या विजयापेक्षा तिचा तो पदक स्वीकारतानाचा भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
रिकामे स्टेडियम आणि सुवर्णकन्या
सतत पडणारा पाऊस आणि प्रेक्षकांविना रिकामे पडलेले स्टेडियम अशा शांत वातावरणात तिरंगा फडकवला जात होता आणि राष्ट्रगीत वाजत होते. पोडियमवर एकटी उभी असलेली ज्योती आपले सुवर्णपदक हातात धरून ओल्या डोळ्यांनी तिरंग्याकडे पाहत होती. तिच्या आजूबाजूला ना कॅमेऱ्यांचा गराडा होता, ना टाळ्यांचा कडकडाट. क्रिकेट आणि फुटबॉलच्या वेडापायी गल्लीबोळात गर्दी करणाऱ्या आपल्या देशात या लेकीच्या विजयाचा साक्षीदार म्हणून तिथे कोणीच नव्हते.
१२.९६ सेकंदांत रचला विक्रम
पावसामुळे निसरडा झालेला ट्रॅक आणि जपानच्या युमी तनाका व चीनच्या यानी वू यांचे तगडे आव्हान असूनही, ज्योतीने १२.९६ सेकंदांची वेळ नोंदवत चॅम्पियनशिपचा नवा रेकॉर्ड केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील पराभवावर मात करत तिने आपल्या तंत्रात बदल केला आणि हर्डल क्वीन हे नाव सार्थ ठरवले. तिचे प्रशिक्षक जेम्स हिलियर यांनी तिच्या या कामगिरीचे वर्णन क्लास ॲक्ट असे केले आहे.
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील एका अत्यंत साधारण कुटुंबात ज्योतीचा जन्म झाला. वडील सूर्यनारायण एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. आई कुमारी दुसऱ्यांच्या घरी घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. अत्यंत मर्यादित संसाधनांत वाढलेल्या ज्योतीने २०१५ मध्ये पहिल्यांदा जिल्हास्तरावर सुवर्ण जिंकले आणि तिथून तिचा प्रवास सुरू झाला. २०१७ मध्ये तिने लांब उडी सोडून हर्डल्स निवडले आणि हाच निर्णय तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया
ज्योतीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स हळहळ व्यक्त करत आहेत. "ज्या खेळाडूसाठी स्टेडियम भरले असायला हवे होते, ती तिथे एकटी उभी आहे," अशा कमेंट्स करत युजर्स भारतीय क्रीडा संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. क्रिकेटच्या प्रेमात ॲथलेटिक्समधील ही खेळाडू दुर्लक्षित राहिल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
पुढचे लक्ष्य २०२६ वर्ल्ड चॅम्पियनशिप
२०२३ आणि २०२५ मध्ये आशियाई सुवर्ण जिंकल्यानंतर आता ज्योतीचे लक्ष्य २०२६ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आहे. त्यासाठी तिला १२.७३ सेकंदांचा टप्पा पार करायचा आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तावूनसुलाखून निघालेली ही लेक आता जागतिक मंचावर तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.