तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:31 IST2025-11-15T06:31:07+5:302025-11-15T06:31:17+5:30
Archery: भारतीय तिरंदाज अंकिता भकतने शुक्रवारी आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सुहयोनला पराभूत करत मोठा उलटफेर घडवला आणि सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, धीरज बोम्मादेवरा याने देखील पुरुष रिकर्व्ह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
ढाका - भारतीय तिरंदाज अंकिता भकतने शुक्रवारी आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सुहयोनला पराभूत करत मोठा उलटफेर घडवला आणि सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, धीरज बोम्मादेवरा याने देखील पुरुष रिकर्व्ह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
अंकिताने पाच सेटच्या आव्हानात्मक फायनलमध्ये ७-३ ने विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय नोंदवून महिला रिकर्व्ह स्पर्धा जिंकली. पुरुष गटात धीरजने अंतिम सामन्यात देशबांधव राहुलला ६-२ ने हरवून पहिले स्थान मिळविले. भारतीय संघाने या अभियानाचा समारोप १० पदकांसह केला, ज्यात सहा सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यामुळे भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. यापूर्वी अंकिताने उपांत्य फेरीत आपली वरिष्ठ सहकारी आणि जगातील माजी नंबर एक तिरंदाज दीपिकाकुमारीला पराभूत केले होते. दोन्ही खेळाडू ५-५ ने बरोबरीत होत्या आणि शूट-ऑफमध्येही दोघांनी नऊ-नऊ गुण मिळविले. परंतु, अंकिताचा तीर केंद्राच्या अधिक जवळ असल्याने तिने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात अंकिताने पहिला सेट २९-२७ ने जिंकला. दुसरा सेट २७-२७ ने बरोबरीत राहिला. नामने तिसरा सेट २८-२६ ने जिंकून बरोबरी साधली. मात्र, चौथ्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजाने शानदार पुनरागमन करत २९-२८ च्या प्रयत्नाने ५-३ ची आघाडी घेतली. या भारतीय खेळाडूने निर्णायक सेटमध्येही उत्कृष्ट खेळ दाखवत सुवर्णपदक जिंकले. भारताने संगीतामुळे महिला रिकर्व्हचे कांस्यपदकही मिळविले. तिने दीपिकाकुमारीला पराभूत केले.
भारताला ऐतिहासिक सुवर्ण
भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने अलीकडच्या काळातील आपला सर्वांत रोमांचक खेळ करत शुक्रवारी दक्षिण कोरियाला अत्यंत अटीतटीच्या शूट-ऑफमध्ये हरवून १८ वर्षांत पहिल्यांदाच आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद सुवर्ण जिंकले. यशदीप भोगे, अतानू दास व राहुल या त्रिकुटाने २-४ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन केले. त्यांनी सेओ मिंगी, किम येचन व जंग जिहो या कोरियन संघाला ५-४ असे नमवत २००९ पासून या स्पर्धेतील कोरियाचे वर्चस्वही संपुष्टात आणले. दोन्ही संघांनी शूट-ऑफमध्ये २९ गुण मिळविले; दासने अनुभवाच्या जोरावर निर्णायक क्षणी १० गुण मिळवले.