नारायण जाधव
नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गाचा विस्तार आणि सुधारणेसह नव्या १० मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय मेरिटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मागविलेल्या निविदांना कोची मेट्रो रेलची एकमेव निविदा प्राप्त झाली. त्यांनी डीपीआर सादर केल्यानंतर १० नव्या मार्गावर स्पीडबोटी, रो-रो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार नव्या मार्गानी जोडले जाणार आहे.
जलवाहतूक मार्ग सुरू करण्यात येणार आहेत, त्या भागातील नद्या, खाड्यांची खोली वाढविणे, खडक दूर करणे, प्रवाशांची संख्या, पर्यावरणावर होणारा आघात या सर्वांचा अभ्यास डीपीआर तयार करताना विचारात घेतला जाणार आहे.
प्रदूषणमुक्तीसह इंधनात बचत होणार
मुंबई - नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर-वसई आणि नजीकच्या उरणसारख्या बंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे.
सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचे अंतर जवळ येऊन इंधनासह वेळेचीही बचत होऊन प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.
सध्याचे १२ मार्ग
१२ मार्गावर जलवाहतूक सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी तीन मार्ग कागदावरच आहेत. यात न्यू फेरी वॉर्फ-मोरा, न्यू फेरी वॉर्फ-रेवस आणि बेलापूर-नेरूळ कागदावरच आहेत, तर अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, वसई-भाईंदर, वर्सोवा-मढ, गोराई-बोरीवली, बोरीवली- एसेल वर्ल्ड, मार्वे-मनोरी, गेटवे ऑफ इंडिया- मांडवा, गेटवे ऑफ इंडिया- एलिफंटा या मार्गात सुधारणा होईल.
हे आहेत १० नवे मार्ग
वसई ते काल्हेर हा मार्ग वसई-मीरा भाईंदर- फाउंटेन जंक्शन, गायमुख, नागला बंदर, काल्हेर असा असेल.
कल्याण ते कोलशेत मार्गाने
कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाणार आहे.
काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्गावर काल्हेर-मुलुंड-ऐरोली- वाशी-नवी मुंबई विमानतळ ही ठिकाणे असणार आहेत.
वाशी ते नवी मुंबई विमानतळ
बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ
गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई
विमानतळ
गेट वे ऑफ इंडिया ते वाशी
वसई ते मार्वे
बोरीवली ते बांद्रा मार्ग बोरीवली-मार्वे-वर्सोवा- बांद्रा असा असणार आहे
बांद्रा ते नरिमन पॉईंट मार्ग हा बांद्रा-वरळी- नरिमन पॉईंट असा असेल