पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:39 AM2019-12-14T00:39:41+5:302019-12-14T00:40:43+5:30

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यात येणार

Water supply shut off in Panvel one day a week | पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेलमध्ये यंदा विक्र मी पावसाची नोंद झाली असली तरी शहरवासीयांची पाणीकपातीतून मुक्तता होणार नाही. शहरवासीयांच्या मागणीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी साठा आहे, यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोरपणे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग (आप्पासाहेब वेदक) धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने या धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. २६०० एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवणूक क्षमता १७०० एमएलडीवर येऊन ठेपली आहे. यापैकी केवळ १५०० एमएलडी पाण्याचा वापर करता येतो. दरवर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये प्रचंड पाणीसमस्या निर्माण होते.

सध्याच्या घडीला पनवेल शहराला सुमारे २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत देहरंग धरणातून १७ एमएलडी, एमजीपीकडून ४ ते ५ एमएलडी व एमआयडीसीकडून ६ एमएलडी पाण्याचे नियोजन केले जाते. विविध विभागांत केलेल्या पाणीकपातीमुळे आठवडाभरात सुमारे ६ ते ७ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यावर आताच नियोजन करण्याच्या दृष्टीने या बचतीमुळे महिन्याला सुमारे १२० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उल्हास वाढ यांनी सांगितले.

शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता एमजेपीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. एमजेपीकडून अतिरिक्त ८ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी मिळाल्यास शहरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव वेलसरू यांना पत्र लिहून अतिरिक्त १५ एमएलडी पाणी पालिकेला देऊन रसायनी ते जेएनपीटी जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.

साठलेल्या गाळाचा सर्व्हे करणार

पनवेल तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद या वर्षी झाली. सुमारे २९ वर्षांचा विक्र म या पावसाने तोडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ देहरंग धरणात पोहोचल्याची शक्यता आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने धरणात किती गाळ साचला आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी वाड यांनी दिली. उन्हाळ्यात पाण्याने तळ गाठल्यावर सर्व्हे करण्यात येणार आहे.

२०१८ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या वर्षी आठवड्यातून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा इतर प्राधिकरणाकडून मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Web Title: Water supply shut off in Panvel one day a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.