विरार-अलिबाग काॅरिडॉरमुळे महामुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, पहिला टप्पा ९८ किमी; ४१ पूल, ५१ उड्डाणपूल, ३९ भुयारी मार्ग बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:50 IST2024-01-20T09:50:18+5:302024-01-20T09:50:41+5:30
मुंबई शहर आणि नवी मुंबईला त्याचा मोठा फायदा होऊन वाहतूक पोलिसांची डोकेदुखी दूर होणार आहे.

विरार-अलिबाग काॅरिडॉरमुळे महामुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, पहिला टप्पा ९८ किमी; ४१ पूल, ५१ उड्डाणपूल, ३९ भुयारी मार्ग बांधणार
नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील बहुचर्चित विरार-अलिबाग काॅरिडॉर अस्तित्वात आल्यानंतर वसई-विरारसह मीरा-भाईंदर, मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांच्या क्षेत्रातील अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे. मुंबई शहर आणि नवी मुंबईला त्याचा मोठा फायदा होऊन वाहतूक पोलिसांची डोकेदुखी दूर होणार आहे.
प्रकल्पात नवघरे ते बालवली हा पहिला टप्पा ९८ किमीचा असून, त्यात ४१ पूल, ५१ उड्डाणपूल, ३९ वाहनचालक भुयारी मार्ग, चार पादचारी मार्ग, नऊ आंतरबदल राहणार आहेत. या मार्गासाठी एकूण १०६२.०७ हेक्टर जमीन लागणार असून, त्यात ३८.८० हेक्टर वनजमीन, १४५ हेक्टर सरकारी जमीन आणि ८७८ हेक्टर खासगी जमीन लागणार आहे.
ही सर्व जमीन संपादित करावी लागणार असून, तिची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी भूसंपादनास मोठा विरोध होत आहे. उरण-पनवेलसह पेणमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अद्याप जमीन दिलेली नाही.
सात महामार्गांना जोडणार
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक ४ ब, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक १७, मुंबई-बडोदरा एक्स्प्रेस-वे सह भिवंडी बायपास जोडण्यात येणार आहे.
सात महामार्गांना तो जोडण्यात येणार असून, त्याचा सर्वाधिक
फायदा भिवंडीच्या गोदामपट्ट्यासह कल्याण येथील प्रस्तावित
ग्रोथ सेंटर, नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर यांना होणार आहे.
विमानतळ, गोदामपट्टा आणि जेएनपीटीतून बाहेर पडणारी अवजड वाहतूक थेट कॉरिडॉरमार्गे त्या-त्या महामार्गाद्वारे बाहेर पडणार आहे.