पे अ‍ॅण्ड पार्किंगमधील वाहने रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:02 AM2019-05-02T02:02:11+5:302019-05-02T02:02:37+5:30

अपघाताची शक्यता : रात्रीच्या वेळी ठेकेदाराची मनमानी

Vehicles on pay and parking are on the roads | पे अ‍ॅण्ड पार्किंगमधील वाहने रस्त्यांवर

पे अ‍ॅण्ड पार्किंगमधील वाहने रस्त्यांवर

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गालगत वाशी येथील इनॉर्बिट मॉलच्या समोर असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्किंगमधील वाहने अनेकदा लगतच्या रस्त्यावर पार्क केली जातात. विशेषत: रात्रीच्या वेळी हा प्रकार सर्रास घडत असल्याने महामार्गावरून पामबीचकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

इनॉर्बिट मॉल आणि सायन-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी महापालिकेने अवजड वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले आहे. या वाहनतळावर एपीएमसीच्या घाऊक मार्केटमध्ये येणारी अवजड वाहने पार्क केली जातात. या वाहनतळाच्या संचालनासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पनवेलकडून मुंबईकडे जाताना पामबीच मार्गाकडे वळसा घेण्यासाठी या वाहनतळाला लागूनच एक अरुंद रस्ता आहे. वाहनतळावर जाणारी वाहने याच रस्त्याचा अवलंब करतात; परंतु अनेकदा वाहनतळाची क्षमता पूर्ण झाल्यानंतर वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अवजड वाहने रस्त्यावर पार्क केल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड होऊन बसते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेकदा या मार्गावरील पथदिवेही बंद असतात. त्यामुळे महामार्गावरून पामबीचकडे जाण्यासाठी वळसा घेताना वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. कारण काळोखामुळे येथे रस्ता आहे की नाही, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून सायन-पनवेल महामार्गावरील जुई उड्डाणपुलावरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यातच लगतच्या वाहनतळावरील वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांची तारांबळ उडताना दिसत आहे.

धोकादायक पार्किंग
या वाहनतळावर मोठे ट्रक, ट्रेलर्ससह केमिकल्सचे कंटेनर्सही पार्क केले जातात. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या वाहनांचे चालक व वाहक येथेचे स्वयंपाक बनवितात. अनेकदा ट्रकच्या खालीच स्टॉव्ह पेटवून जेवण बनविले जाते, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Vehicles on pay and parking are on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.