बॅग अन् बुटांमुळे हत्येच्या तपासात ट्वीस्ट; मृतदेहापासून १० मीटरवर आढळले बापाचे कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 01:34 IST2025-05-08T01:33:54+5:302025-05-08T01:34:00+5:30

तुर्भे एमआयडीसी परिसरात झाडीमध्ये १२ वर्षीय मुलीचा मृतदेह मिळून आला होता. घटनेच्या दिवशीच दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी रात्री केली होती.

Twist in murder investigation due to bag and shoes; Father's clothes found 10 meters from body | बॅग अन् बुटांमुळे हत्येच्या तपासात ट्वीस्ट; मृतदेहापासून १० मीटरवर आढळले बापाचे कपडे

बॅग अन् बुटांमुळे हत्येच्या तपासात ट्वीस्ट; मृतदेहापासून १० मीटरवर आढळले बापाचे कपडे

- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गुन्हा घडल्यावर पोलिस घटनास्थळी सुगावा शोधण्यावर भर देतात. मृतदेहापासून दहा मीटरवर मृताच्याच बापाचे कपडे मिळून 
आले तर साहजिकच त्याच्यावरच हत्येचा संशय बळावणार. तपासाचा एकही धागा न सोडता नवी मुंबई पोलिसांनी मुलीच्या हत्येचा छडा लावून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

तुर्भे एमआयडीसी परिसरात झाडीमध्ये १२ वर्षीय मुलीचा मृतदेह मिळून आला होता. घटनेच्या दिवशीच दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी रात्री केली होती. त्यानंतर तासाभरातच तिचा मृतदेह दाट झाडीत मिळून आला होता. मुलीचा चेहरा दगडाने ठेचलेला असल्याने गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस यांची अनेक पथके रातोरात तपासकामात गुंतली. त्यासाठी सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे, सहायक आयुक्त मयूर भुजबळ यांनी वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सुमारे २५ अधिकारी 
व ३५ ते ४० कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार केली. या वेळी रात्री १२:३०च्या सुमारास मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून अवघ्या दहा मीटरवर दोन बॅग मिळून आल्या. एकात पुरुषाचे कपडे व इतर साहित्य, तर दुसऱ्या बॅगेत बूट होते. हे कपडे कोणाचे असावेत, हे शोधत असतानाच मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून ती बॅग मुलीच्या वडिलांचीच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे बापानेच तर मुलीची हत्या केली नाही ना? असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यांच्याकडे चौकशी केली. 

पोलिसांनी त्याचा संपूर्ण दिवसभराचा आढावा घेऊन त्याची पडताळणी केली. परंतु, तो 
दुपारनंतर घटनास्थळी गेलाच नसल्याचे सुमारे तीन तासांच्या तपासात 
पोलिसांना निष्पन्न झाले. मग खरा मारेकरू कोण? याच्या शोधात पुन्हा वेगळ्या मार्गाने पोलिसांना तपास करावा लागला.

बॅग घटनास्थळी कशी?
मुलीच्या बापाची बॅग घटनास्थळी कशी, हे पोलिसांकडून तपासले जात असताना मुलीच्या आई-वडिलांमध्ये आपसात भांडण असल्याचे समोर आले. यामुळे तो घरात राहत नसून घटनास्थळी झाडीमध्ये त्याने बॅग ठेवण्याची जागा केली होती. त्याच ठिकाणी तो कपडे बदलून कामावर जात असे.

...अन् आरोपी फसला
चौकशीत मृत मुलीचा मोबाइल एका मुलाने घरी आणून दिल्याचे समोर आले. या मुलाने रस्त्यात आपल्याला मोबाइल सापडल्याचे सांगितले होते. त्याला घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पडताळणी केली असता अनेक विसंगती दिसून आल्या. तो काहीतरी लपवत असल्याच्या संशयाने रात्रभर त्याच्याकडेच केलेल्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली, तर संशय येऊ नये म्हणून तो मुलीच्या घरी मोबाइल द्यायला गेला होता.

मुलीच्या हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
त्याने मुलीची हत्या नेमकी का केली, हे स्पष्ट झालेले नाही. त्याच्या कारणांमध्ये स्पष्टता नसल्याने पोलिसांचे समाधान झालेले नाही. यामुळे पुन्हा एकदा त्याची चौकशीची अनुमती पोलिस न्यायालयाकडे मागणार आहेत.

Web Title: Twist in murder investigation due to bag and shoes; Father's clothes found 10 meters from body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.