सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:32 IST2025-07-10T06:32:11+5:302025-07-10T06:32:40+5:30
सध्या सोशल मीडियावर मनोरंजन कमी, ‘बोल्ड’ कंटेंट जास्त पाहायला मिळत आहेत. यामुळे दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीत संबंध होऊन मुलगी गरोदर राहिल्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत

सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : खेळण्याच्या वयात मुलींनी वासनेला बळी पडण्याचे प्रकार घडत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे शोषण केले जात आहे. किशोरवयातच काही मुली लैंगिक शोषणाला बळी पडून नैराश्यात जाण्याचे किंवा अकाली माता बनण्याचे प्रकार घडत आहेत. कुटुंबाचे दुर्लक्ष, मोबाइलद्वारे सहज मिळणारा लैंगिक भावना चाळवणारा कंटेन्ट आणि गैरसंगतीतून मुला-मुलींचे भविष्य धोक्यात येत आहे.
‘सोळावं वरीस धोक्याचं’ या गाण्यातून मांडलेली परिस्थिती सध्या प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. या धोक्याच्या वयात किंवा अलीकडे त्याही आधी फसवून मुलींचे लैंगिक शोषण केले जाते. साधारण १५-१६ वर्षांच्या मुला-मुलींमध्ये लैंगिक आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे. मुलींचे कायद्याने संज्ञान होण्याचे वय १८ आहे. मात्र, किशोरवयीन मुला-मुलींच्या भावनांना बांध कसा घालणार? असाही प्रश्न आहे. अनेक किशोरवयीन मुली नकळत आपले कौमार्य गमावत आहेत. प्रेमाच्या जाळ्यात फसून किंवा स्वतःला लैंगिक आकर्षणातून असे प्रकार घडत आहेत. यामध्ये मुलीचे वय अल्पवयीन असल्याने संमतीने जरी संबंध प्रस्थापित झाले असले तरीही तो अत्याचारच, या कायद्याच्या आधारावर पोक्सोचे गुन्हे दाखल होत आहेत; परंतु काही प्रकरणांत मुली गरोदर राहत असल्याने, तर काहींची प्रसूतीही होत असल्याने अशा मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
सध्या सोशल मीडियावर मनोरंजन कमी, ‘बोल्ड’ कंटेंट जास्त पाहायला मिळत आहेत. यामुळे दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीत संबंध होऊन मुलगी गरोदर राहिल्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत, तर प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीने तरुणाला सर्वस्व अर्पण केल्याच्या घटना दिवसाआड समोर येत आहेत. अशा प्रकरणातून दोन गुन्हेही दाखल आहेत, तर प्रेमसंबंधातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरातच लपून केलेली प्रसूती जिवावर बेतल्याचेही वाशीत घडले आहे. अशा घटना पालकांच्या चिंतेत भर टाकत आहेत.
आदिवासी पाड्यांमध्ये बेकायदा लग्नाचे प्रकार
पनवेल परिसरात अद्यापही काही आदिवासी पाड्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, प्रसूतीदरम्यान रुग्णालयात तिचे वय समोर येताच गुन्हे दाखल होत आहेत. नुकतेच एका मातेने आपल्या मुलास अनाथालयाच्या बाहेर सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण संवादाची गरज
कुमारवयातील मुला-मुलींशी पालकांनी संवाद वाढवून त्यांच्याशी चांगल्या-वाईट गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक आहे. मुला-मुलींना समजून घेऊन त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते पालकांनी निर्माण केले पाहिजे. जबाबदार लैंगिक वर्तन, बेजबाबदार लैंगिक वर्तनाचे कौटुंबिक-सामाजिक दुष्परिणाम, व्यक्तिगत नुकसान, शिक्षण आणि करिअरवर होणारा परिणाम याची चर्चा मुलांशी करणे गरजेचे आहे. आई-वडील नोकरी करतात. मुलांना द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल तर अशी मुले एकाकी पडतात आणि गैरसंगतीला लागतात.