रात्री उशीरापर्यंत स्फोटाच्या आवाजांनी थरकाप उडायचा; परतलेल्या खारघरच्या दाम्पत्याने सांगितला थरार
By वैभव गायकर | Updated: March 5, 2026 05:42 IST2026-03-05T05:41:59+5:302026-03-05T05:42:19+5:30
- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : बरशा परिसरातील नोवोटेल या हॉटेलमध्ये थांबलो होतो. रात्री उशीरापर्यंत डोक्यावरून जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या ...

रात्री उशीरापर्यंत स्फोटाच्या आवाजांनी थरकाप उडायचा; परतलेल्या खारघरच्या दाम्पत्याने सांगितला थरार
- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : बरशा परिसरातील नोवोटेल या हॉटेलमध्ये थांबलो होतो. रात्री उशीरापर्यंत डोक्यावरून जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या स्फोटाच्या आवाजाने थरकाप उडायचा. मात्र, रडार यंत्रणेमुळे क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट व्हायची. त्यामुळे ती जमीनीवर पडली नाहीत. परंतु, जीव मुठीत घेऊन होतो. असा थरारक अनुभव खारघरच्या सिद्धार्थ(२९) व रिंकल(२७) तोडेकर या मायदेशी परतलेल्या दाम्पत्याने सांगितला.
३ मार्चला पहाटे साडेचार वाजता हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. दोघेही २५ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारीला ते दुबई मिरॅकल गार्डन येथे फिरत असताना दुपारी आकाशात स्फोटासारखा आवाज झाल्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले. दरम्यान, ३ मार्च रोजी रात्री इमिरात एअर लाईन्स विमानाने उड्डाण घेतले. “उड्डाणावेळी पायलटने कमी उंचीवरून सुरक्षित हवाई मार्गाने विमान नेल्याचे सिद्धार्थ म्हणाले.
आम्ही स्वतःच दुबई ट्रिपचे नियोजन
केले होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्लाइट रद्द होत राहिल्या. त्यामुळे तणाव वाढला. दुबईची रडार यंत्रणा सक्षम असल्याने हवेतच क्षेपणास्त्रे निष्प्रभ होत होती; पण भीती जाणवत होती,”
सिद्धार्थ तोडेकर, खारघर गाव
चार उड्डाणे रद्द
२ मार्चचे नियोजित उड्डाण रद्द
३ मार्च रोजी दुपारी १.३० ची हैदराबाद फ्लाईट रद्द
त्यानंतर बंगळुरूची फ्लाईट रद्द
रात्री ९:३० ची फ्लाईटही विमानतळाजवळील हालचालींमुळे रद्द
अखेर रात्री १०:१५ वाजता एमिरेट्सचे उड्डाण; पहाटे मुंबईत आगमन