आता साकारणार देशातील पहिले तरंगते विमानतळ; व्यवहार्यता अभ्यास सुरू
By नारायण जाधव | Updated: October 10, 2025 09:28 IST2025-10-10T09:28:12+5:302025-10-10T09:28:24+5:30
जेएनपीए, नवी मुंबई विमानतळाला जोडणार

आता साकारणार देशातील पहिले तरंगते विमानतळ; व्यवहार्यता अभ्यास सुरू
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण येथील प्रस्तावित ऑफशोअर अर्थात समुद्रातील विमानतळाचे पुन्हा एकदा सुतोवाच केले आहे. त्याचा पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात मागविलेल्या निविदांना सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यात ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोई इंडियाची निवड केली आहे. या कंपनीने सकारात्मक अहवाल दिल्यानंतरच वाढवणच्या ऑफशोअर विमानतळाला चालना मिळणार असून तसे झाल्यास ते देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ ठरणार आहे.
वाढवण येथील ऑफशोअर एअरपोर्ट संदर्भात पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी राज्याने निविदा मागवल्या होत्या. त्यांना सात कंपन्यांनी बोली दिली होती, ज्यात सीपीजी कॉर्प, क्रिएटिव्ह ग्रॅप, ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोई, पिनी ग्रॅप, रॅम्बोल, राइट्स आणि एसए इन्फ्रा या नामांकित कंपन्यांचा समावेश होता. यात कमी बोली लावणाऱ्या ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोईची निवड केली आहे. महाराष्ट्र एअर पोर्ट ॲथोरिटी, मेरिटाईम बोर्ड आणि जेएनपीए या तीन संस्थांचे यासाठी सहकार्य लाभले आहे.
प्रस्तावित ऑफशोअर विमानतळासाठी समुद्रात नेमका कोठे आणि किती हेक्टरचा भराव टाकायचा ती साईट निवडणे, जमिनीची गरज भासेल का, समुद्र विज्ञानाचा अभ्यास करून संभाव्य धोके कोणते आहेत, समुद्री पर्यावरण बिघडेल काय, समुद्री जलचरांना कितपत व कोणता धोका उद्वभवेल, या एअरपोर्टसाठी किती हेक्टर भराव टाकावा लागणार, त्यासाठी खडी, माती कोठून आणणार, हायड्रोलॉजिकल मूल्यांकन करावे लागणार आहे.
विमानतळाची गरज का?
वाढवण येथे राज्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक खोलीच्या बंदराचे काम जेएनपीएच्या सहकार्याने सुरू झालेले आहे. यामुळे हे बंदर पूर्ण झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढणार आहे.
हे बंदर मुंबई-अहमदाबाद महामार्ग, नियोजित जेएनपीए दिल्ली फ्रेट कॉरिडोर, जेएनपीए-दिल्ली महामार्गासह समृद्धी आणि प्रस्तावित विरार अलिबाग कॉरिडोरच्या माध्यातून हे बंदर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीएला जोडण्यात येणार आहे. त्याच दृष्टीने वाढवणलाच नवे विमानतळ बांधल्यास मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूक अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.