तरुणाचा मृतदेह आढळला दगडांच्या ढिगाऱ्याखाली; एटीएम कार्ड चोरीच्या तक्रारीसाठी आला होता, पण नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:35 IST2025-01-31T09:35:20+5:302025-01-31T09:35:40+5:30

परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना कळवले असता, तेथे मृतदेह सापडला. 

The body of a young man was found under a pile of stones | तरुणाचा मृतदेह आढळला दगडांच्या ढिगाऱ्याखाली; एटीएम कार्ड चोरीच्या तक्रारीसाठी आला होता, पण नंतर...

तरुणाचा मृतदेह आढळला दगडांच्या ढिगाऱ्याखाली; एटीएम कार्ड चोरीच्या तक्रारीसाठी आला होता, पण नंतर...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार देण्यासाठी आलेला तरुण दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाचा दगडांखाली लपवलेला मृतदेह पोलिसांना आढळला आहे. त्याच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रबाळे एमआयडीसीमधील यादवनगर परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी ट्रक टर्मिनलजवळच्या नाल्याशेजारी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. नाल्याच्या भिंतीलगत पडलेल्या या मृतदेहावर दगडांचा ढीग टाकलेला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना कळवले असता, तेथे मृतदेह सापडला. 

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटली नव्हती. परंतु, रबाळे एमआयडीसी परिसरातून बेपत्ता तरुणांच्या पडताळणीत तो मृतदेह यादवनगरच्या मनोज बिंद (२२) याचा असल्याचे स्पष्ट झाले. मनोज याच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पाणीपुरीचा होता स्टाॅल 
मनोजचा पाणीपुरीचा स्टॉल होता. त्याचे एटीएम कार्ड काही दिवसांपूर्वी हरवले होते. त्या एटीएममधून अज्ञाताने पैसे काढल्याची तक्रार देण्यासाठी तो १७ जानेवारीला रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे आला होता. 
परंतु, गुन्हा नोंदविण्यासाठी त्याला दुसऱ्या दिवशी बोलावले होते, असे समजते. यानंतर तो बेपत्ता झाल्याने व शोध घेऊनही न सापडल्याने कुटुंबीयांनी २१ जानेवारीला मनोज हरवल्याची तक्रार पोलिसांत केली. 
बुधवारी त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. त्याच्या हत्येमागचे कारण स्पष्ट नसल्याचे तसेच चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

शर्टवरून पटली ओळख 
मनोजचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याची हत्या करून मृतदेह तेथे टाकल्याची शक्यता आहे. त्याच्या अंगावरील शर्टवरून कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली आहे. 

हत्येमागे एटीएम चोरीचे कारण? 
मनोजचे एटीएम कार्ड चोरून त्यामधून पैसे काढणाऱ्यांनी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मनोज हा पोलिसांकडे तक्रार करणार याच भीतीतून संबंधितांनी हे कृत्य केल्याची शक्यता आहे.

Web Title: The body of a young man was found under a pile of stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.