17 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षकाला आईमुळे मिळाली होती नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:23 IST2020-02-29T03:22:13+5:302020-02-29T03:23:31+5:30
शाळेकडून निलंबनाची कारवाई; जुन्या कामांच्या ठिकाणीही होणार चौकशी

17 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षकाला आईमुळे मिळाली होती नोकरी
नवी मुंबई : सहावी ते आठवीच्या १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिक्षक आईच्या शिफारशीवरून शाळेत नोकरीला लागल्याचे समोर आले आहे. त्या शाळेतून त्याचे निलंबन केले आहे.
तो डोंबिवलीत राहणारा असून अविवाहित आहे. संगणक प्रशिक्षण घेतल्यानंतर २००९ पासून त्याने संगणक शिक्षक अनेक ठिकाणी नोकरी केली. एका सामाजिक संस्थेमार्फत तो पालिका शाळेत चार महिन्यांपासून नोकरी करत होता. शाळेच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त मुलींना प्रशिक्षणासाठी बोलावून तो अश्लील चाळे करायचा. त्यामध्ये दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. याप्रकरणी शाळेने पोलिसांत तक्रार दिली.
तो आईच्या नावाचा वापर करून त्या शाळेत नोकरीला लागला होता. त्याच्या आईने त्या शाळेत काम केले असल्याने तेथे संगणक शिक्षक म्हणून नोकरीची संधी देण्याची मागणी त्याने संस्थेकडे केली. तत्पूर्वी दोन महिने तो संबंधित संस्थेतच अकाउंटचे काम पाहत होता; परंतु टॅली जमत नसल्याने वरिष्ठ त्याच्यावर नाखूश होते. दरम्यान, संबंधित पालिका शाळेत संगणक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली.
जुन्या कामांच्या ठिकाणीही होणार चौकशी
त्याने ज्या शाळांमध्ये नोकरी केली त्यात कामोठेतील शाळेसह डोंबिवली, ठाणे आदी ठिकाणच्या खासगी शाळांचा समावेश आहे. पोलिसांकडून त्याच्या या कामांच्या ठिकाणीही चौकशी होणार असल्याने त्याची अशी कृत्ये समोर येण्याची शक्यता आहे.