टँकरमाफिया पळवताहेत पाणी

By Admin | Updated: March 5, 2016 02:18 IST2016-03-05T02:18:25+5:302016-03-05T02:18:25+5:30

शहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत

Tanker | टँकरमाफिया पळवताहेत पाणी

टँकरमाफिया पळवताहेत पाणी

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
शहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. तर चोरीचे हेच पाणी अडीच हजार रुपयांना एक टँकर याप्रमाणे शहरवासीयांनाच विकले जात आहे.
मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने कधीही पाणीकपात होणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेलाही पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. गतवर्षी मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शहरवासीयांना सध्या शटडाऊनला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने पुरवठा होत असून, सर्वत्रच पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून, प्रत्येक टँकरमागे सुमारे अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशातच नागरिकांच्याच तोंडचे पाणी चोरून टँकरने पुरवले जात असल्याची बाब उघड झाली आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे. परंतु अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती पालिका अधिकाऱ्यांना नाही, याबाबत साशंकता आहे. जुन्या बेलापूर विभाग कार्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर हा प्रकार सुरू आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याने पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संमतीनेच ही पाणीचोरी होत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी दररोज १० हजार लिटर क्षमतेचे सुमारे ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत. यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत टँकरच्या रांगा लागत असून, त्यामधून सुमारे ५ लक्ष लिटर पाणी दररोज चोरीला जात आहे.
तर चोरीच्या याच पाण्याची
मागणी वाढवण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 2014-15
मध्ये पाणीपुरवठ्यावर ११५ कोटी रुपये खर्च झाले असून, पाणी बिलापोटी अवघे ८६ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले आहेत. पालिका क्षेत्रात एकूण ५६ जल उदंचन केंद्रे आहेत. तर एबीआर भूमिगत व उच्चस्तरीय असे पाणी साठवण्यासाठी ११४ जलकुंभ. आहेत. जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्र पाडून त्यामधून पाण्याची चोरी होत आहे. शहरात टँकरमाफियांचे जाळे पसरले असून चाळी, इमारती, अनेक सोसायट्यांना पिण्यासाठी तसेच विकासकांना बांधकामासाठी चोरीचे पाणी पुरवले जात आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावाही यामुळे फोल ठरला आहे. अनेक विभागांमध्ये अद्यापही दिवसातून किमान दोन तास देखील पाणीपुरवठा होत नाही. तर गळतीची कारणे नजरेसमोर असतानाही प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. शाहबाज गाव येथे रेल्वेपुलाखाली मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला छेद करून व्हॉल्व बसवण्यात आलेला आहे. त्यावर पाणीउपसा करणारी उच्च क्षमतेची मोटर बसवून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरावर तीनहून अधिक ठिकाणी जलवाहिनीला छेद करून त्या ठिकाणी ही पाणीचोरी सुरू आहे.

Web Title: Tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.