एक कोटींच्या खंडणीसाठी गायकाला दिली धमकी; गोल्डी ब्रार असल्याचा मेसेजमध्ये उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:56 IST2025-05-28T06:56:09+5:302025-05-28T06:56:16+5:30
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एक कोटींच्या खंडणीसाठी गायकाला दिली धमकी; गोल्डी ब्रार असल्याचा मेसेजमध्ये उल्लेख
नवी मुंबई : सीवूड येथे राहणारे गायक मोहम्मद बिलाल शेख यांना मोबाइलवर मेसेज करून १ कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. मेसेजमध्ये धमकी देणाऱ्याने स्वतःचा उल्लेख गँगस्टर गोल्डी ब्रार असा केला असून, तर शेवटी लॉरेन्स बिष्णोई गँगचा गँगस्टर रोहित गोदारा याच्याही नावाचा उल्लेख आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद बिलाल शेख हे सीवूड येथील प्रसिद्ध रॅपर इमीवे बंटाई याच्या म्युझिक कंपनीतील गायक आहेत. मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कंपनीच्या वापरासाठी असलेल्या मोबाइलवर एक मेसेज आला. त्यात स्वतःला गँगस्टर गोल्डी ब्रार असे सांगत २४ तासात १ कोटी रुपये दे अन्यथा ठार मारू, अशी धमकी दिली. या संदर्भात कंपनीतर्फे एनआरआय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून मेसेज पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, खंडणीचा प्रत्यक्षात गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याशी संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
मुसेवाला यांच्या स्मरणार्थ गायले होते गाणे
कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्यावर पंजाबचे रॅपर गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे, तर गायक मोहम्मद बिलाल यांनी दोन दिवसांपूर्वीच सिद्धू मुसेवाला यांच्या स्मरणार्थ गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यामुळे मुसेवाला यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून सर्व स्तरांतून चौकशी केली जात आहे.