धक्कादायक! दारु पाजून मुलीला इमारतीवरून ढकलल्याचा आरोप; मृत्यूप्रकरणी मित्रावर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 12, 2023 16:01 IST2023-06-12T16:01:13+5:302023-06-12T16:01:31+5:30
बेलापूर मधील घटना.

धक्कादायक! दारु पाजून मुलीला इमारतीवरून ढकलल्याचा आरोप; मृत्यूप्रकरणी मित्रावर गुन्हा
नवी मुंबई : इमारतीवरून पडून अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या मित्रावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राने तिला दारू पाजून इमारतीवरून ढकलल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे.
बेलापूर सेक्टर १५ येथील डीमार्ट लगतच्या पडीक इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी हि घटना घडली होती. पनवेल परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी बेलापूर मधील तिच्या मित्राकडे आली होती. तिचा मित्र शिवम ननवरे (२०) याचे वडील रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी ती आली असता आदल्या रात्री ती त्याच्याच घरी थांबली होती. त्यांच्या प्रेमसंबंधाला दोघांच्या कुटुंबाकडून मान्यता असल्याने मुलगी वयात आल्यानंतर त्यांचे लग्न करून दिले जाणार होते.
दरम्यान, गुरुवारी दुपारी शिवम हा मैत्रिणी व इतर एका मित्रासह डीमार्ट लगतच्याच इमारतीवर बियर पिण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाल्याने मुलीला शिवम याने इमारतीवरून ढकलून दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यावरून शिवम याच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. त्यानुसार एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शिवम ननवरे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिस अधिक तपास करत आहेत.