नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:58 IST2025-12-04T05:57:42+5:302025-12-04T05:58:32+5:30
शिंदेसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेत प्रवेश केला.

नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : ठाण्यापाठोपाठ शिंदेसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यातील मारामाऱ्यांना कंटाळून अनेक कार्यकर्ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदेसेना व भाजपला लगावला.
शिंदेसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेत प्रवेश केला.
सध्या त्यांची आपआपसातच हाणामारी सुरू आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरमधून बॅगा कशा नेल्या जात होत्या हे सर्वांनी पाहिले आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
नागरिकांवर हेरगिरी करण्याचा प्रकार
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे. पेगॅससचे नाव बदलून संचारसाथी ठेवले आहे. आपल्याच नागरिकांवर त्यांनी अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. नागरिकांवर पाळत ठेवण्याचा हा प्रकार आहे. त्यापेक्षा दहशतवाद्यांवर पाळत ठेवा, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.
ठाकरे म्हणाले, “संभ्रम आणि घोटाळ्यांतून सगळे आता जागे होत आहेत. म्हणून तिकडे गेलेले ठाणे, नवी मुंबईतील अनेक जण परत येत आहेत. निवडणुकीत त्यांचेच लोक त्यांच्यावर धाडी टाकताहेत. ज्याच्यावर धाड टाकली त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. पण, धाड टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो. असा देश आपल्याला अपेक्षित नव्हता.”