"पंतप्रधान, मुख्यमंत्री येऊन गेले पण उद्घाटन करायला वेळ नाही"; छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन शर्मिला ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:43 IST2025-11-18T12:35:43+5:302025-11-18T12:43:58+5:30
नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला.

"पंतप्रधान, मुख्यमंत्री येऊन गेले पण उद्घाटन करायला वेळ नाही"; छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन शर्मिला ठाकरेंची टीका
Sharmila Thackeray: नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी मनसेचे युवानेते अमित ठाकरेंसह ७० कार्यकर्त्यांवर रविवारी गुन्हा दाखल झाला. महाराजांचा पुतळा चार महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारमधील मंत्र्यांना इतर पक्षातील कार्यकर्ते फोडून आपापल्या पक्षात घेण्यासाठी वेळ आहे, परंतु, महाराजांचे स्मारक तयार असूनही उद्घाटनासाठी वेळ नाही. त्यातच तो घाणेरड्या कापडांनी झाकणे हे खेदजनक असल्याची टीका अमित ठाकरेंनी केली होती. त्यानंतर तो पुतळा पुन्हा झाकण्यात आला असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुसरीकडे शर्मिला ठाकरे यांनीही या प्रकरणी भाष्य करताना सरकारवर टीकास्त्र डागलं.
नेरुळमध्ये उद्घाटनाअभावी बंदिस्त करून ठेवलेली नेरूळ येथील शिवसृष्टी रविवारी मनसेने खुली केली. पोलिसांसोबत हुज्जत घालून महापालिकेच्या या वास्तूचे अनौपचारिक उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर नेरूळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेने शिवसृष्टी बंदिस्त करून आतला छत्रपतींचा पुतळादेखील झाकला. त्या ठिकाणी अद्याप बरीच कामे बाकी असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. या उद्घाटनावरून मनसे विरुद्ध भाजप असा वाद पेटला आहे. याप्रकरणी बोलताना अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचा अभिमान असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं.
"१७००, १८०० कोटींचे जमिनीचे व्यवहार होतात, त्यावर स्टॅम्प ड्युटी माफ होते, त्यात घोटाळे होतात आणि त्यावर कोणतीही कारवाई नाही, केस नाही. अमितबद्दल मला अभिमान आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा मातीने माखलेला होता. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात. त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती महत्त्व आहे हे यातून कळतं. पंतप्रधान, मुख्यमंत्री येऊन गेले पण त्यांना उद्घाटन करायला वेळ नाही," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
अमित ठाकरे काय म्हणाले?
"शाखा उद्घाटनासाठी नवी मुंबईत गेलो असता लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यांनी झाकलेला असल्याचे कळले. पदाधिकाऱ्यांनी पालिकेला तीन दिवसांचा अल्टिमेट देण्याचा सल्ला दिला होता. अल्टिमेटम देणार, पोलिस सुरक्षा लागणार, यापेक्षा लोकार्पण करण्याचे ठरवले. त्यावर त्यांनी केस होईल, असे सांगितले. महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा अपमान सहन करणार नाही. महाराजांसाठी गुन्हा दाखल झाल्याने बरे वाटले," अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.