ज्येष्ठ नागरिकाला नफ्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 05:20 IST2025-05-14T05:19:53+5:302025-05-14T05:20:37+5:30

सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

senior citizen cheated of 1 crore 5 lakh by luring him with profit in navi mumbai | ज्येष्ठ नागरिकाला नफ्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

ज्येष्ठ नागरिकाला नफ्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने खारघरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी ५ लाखांची फसवणूक झाली आहे. दोन महिन्यांनी फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

टाटा स्टीलमधून निवृत्त झालेल्या ६४ वर्षीय अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे. २ मार्चला त्यांना एका व्यक्तीने फोन करून तो एका गुंतवणूक कंपनीचा सल्लागार असल्याचे सांगितले आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन त्याठिकाणी इतरांना होत असलेल्या नफ्याची माहिती दाखवून त्यांनाही भुरळ घालण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी टप्प्याटप्प्याने १ कोटी ५ लाख रुपये गुंतवले.

काही दिवसांतच त्यांना सुमारे तीन कोटींचा नफा झाल्याचेही भासवण्यात आले; परंतु नफा किंवा मूळ रक्कम काढण्यासाठी अधिक पैशाची मागणी होऊ लागली. यावरून त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: senior citizen cheated of 1 crore 5 lakh by luring him with profit in navi mumbai