Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 08:35 IST2025-11-22T08:32:57+5:302025-11-22T08:35:16+5:30
Nerul Shivaji Maharaj statue inauguration: नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे शुक्रवारी संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे शुक्रवारी संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यापूर्वी मनसेने आंदोलन करून या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. या प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी सूचना गणेश नाईक यांनी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र गैरहजर होते.
नवी मुंबई पालिकेने सेक्टर १ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे. अनेक महिन्यांपासून अनावरण झाले नसल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करताच मनसेने पुतळ्याचे अनावरण केले होते. दरम्यान,महाराजांवरील प्रेमापोटीच अमित ठाकरे यांनी अनावरण केले. या विषयावर राजकारण नको. आमचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते कायदा पाळणारे कुटुंब आहे, असे गणेश नाईक म्हणाले.
राजकारण नको
अमित यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची सूचना पोलिस आयुक्तांना करणार आहे. असे गणेश नाईक म्हणाले. सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य त्यांनी टाळले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, जे. डी. सुतार, देवनाथ म्हात्रे उपस्थित होते.
श्रेयवाद नको: नरेश म्हस्के
सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नरेश म्हस्के अनुपस्थित होते. याविषयी पत्रक काढून म्हस्के यांनी भूमिका मांडली. महाराजांच्या पुतळ्याचे पाच महिन्यांपासून रखडलेले अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले होते. यामुळे पुन्हा अनावरण करणे योग्य नाही, असे स्पष्ट करून महाराजांच्या विषयावर राजकारण केले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मनसेचे गजानन काळे यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.