‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:37 IST2025-07-09T06:37:24+5:302025-07-09T06:37:24+5:30
या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे

‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी
नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’ योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गेल्यावर्षी विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांपैकी ६० टक्के घर विक्रीचे उद्दिष्ट सिडकोला पार करता आले नाही. घरांच्या अवाजवी किमतींमुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेसाठी मांडण्यात आला आहे.
सिडकोने विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांपैकी फक्त १० हजार ग्राहकांनी घरांसाठीची पुष्टीकरण रक्कम भरली आहे. त्यामुळे उर्वरित १६ हजार घरे अद्याप विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सदर मुद्द्यावर लक्षवेधी उपस्थित करून, घरांच्या किमती तत्काळ २५ ते ३० टक्क्यांनी कमी कराव्यात आणि सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. योजना प्रभावी करण्यासाठी तसेच या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे.
१० हजार ग्राहकही गोंधळात
पुष्टीकरण रक्कम भरलेले १० हजार ग्राहकही गोंधळात असून, काही बुकिंग रद्द करतील की काय, अशी चिंता सिडकोला सतावत आहे. शिवाय, कर्जासाठी पात्रतेचा मुद्दा अद्याप अनिश्चित असल्याने घर विक्रीचा भविष्यकाळ धूसर आहे.
१६ हजार घरे विक्रीविना
‘माझे पसंतीचे घर’ या गृह योजनेत घर विक्रीचे किमान ६० टक्के उद्दिष्ट होते; परंतु प्रत्यक्ष प्रतिसाद ३८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. विशेष म्हणजे सोडतीत समाविष्ट केलेल्या २१ हजार ग्राहकांपैकी ११ हजार ग्राहकांनी पुष्टीकरण दिलेले नाही. तर उर्वरित ५००० घरे सोडतीच्या बाहेरच राहिली. सध्या एकूण १६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत.