रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:04 PM2024-04-02T22:04:54+5:302024-04-02T22:05:04+5:30

चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा

Ransai, Punade dams out of water: Water crisis for farmers of two lakh population | रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

मधुकर ठाकूर

उरण :उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तर पुर्व विभागातील १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण परिसरातील २५ ग्रामपंचायती आणि औद्योगिक प्रकल्पास सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.अपुऱ्या पावसामुळे यावर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तसेच उरण परिसरातील अनेक गावातील विहीरी, तलाव यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उरण परिसरातील २५ ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीं पैकी चाणजे आणि केगाव या दोन ग्रामपंचायतींमधील गावांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे.चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या

३० हजारांहून अधिक आहे.लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत चाणजे ग्रामपंचायत ओळखली जाते.करंजा,नवापाडा,सातघर, सुरकीचापाडा,चाणजे, डाऊरनगर आदी पाडे व गावातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे.चाणजे हद्दीतील नागरिकांना १५ दिवसातुन एकदा तेही फक्त एकच तास पाणी दिले जात आहे.चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाच्या अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीकडूनही ग्रामपंचायतीच्या मागणी प्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि पाणी पुरवठ्याबाबत योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने मात्र राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या विविध योजना कुचकामी ठरल्या आहेत.परिणामी चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील २० हजार नागरिकांनाही मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना ८-१० दिवसात फक्त एक दिवस एक तासच पाणी पुरवठा केला जात आहे.मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व योग्य दाबाने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी ६ इंचाची व्यासाची पाईप लाईन टाकण्याची मागणी केली जात आहे.मात्र यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींमध्ये फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.परिणामी नागरिकांसाठी पाणी टंचाई ही कायमची समस्या बनली आहे.

जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. बेटवासियांना समुद्रमार्गे होडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे  केली आहे .मात्र  ग्रामपंचायतीच्या मागणीनंतरही शासकीय यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे घारापुरी बेट पाण्याचे दुर्भिक्ष बनले असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होडीतून टाक्या भरून पाणी आणून गुरुवारपासून बेटवासियांना पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणातून मागील अनेक वर्षांपासून पुनाडे, वशेणी, सारडे,कडापे,पिरकोन, पाले,गोवठणे,आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ३५ वर्ष जुन्या धरणाला सातत्याने लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेला गाळ काढण्यात शासकीय विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे पुनाडे धरण पुर्णता गाळाने भरल्याने या ९ गावातील २० हजार नागरिकांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे.याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते.मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या अध्यक्षा अनामिक म्हात्रे यांनी दिली.

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली असल्याने दररोज सिडकोच्या हेटवणे धरणातून चार एमएलडी पाणी उसणे घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहोत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये यापुर्वीच दोन दिवस पाणी कपातही लागू केली आहे. नागरिकांनीही जुन महिना अथवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन करण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

Web Title: Ransai, Punade dams out of water: Water crisis for farmers of two lakh population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.