दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त
By नारायण जाधव | Updated: November 7, 2023 16:40 IST2023-11-07T16:40:45+5:302023-11-07T16:40:58+5:30
मोटारसायकलवरून आलेले आरोपी मोबाइल फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील फोन खेचून घेऊन जात होते.

दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त
नवी मुंबई : मोटारसायकलवरून जबरीने मोबाइल खेचून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष दोनने अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार रुपये किमतीचे २९ मोबाइल जप्त करून सतरा गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
मोटारसायकलवरून आलेले आरोपी मोबाइल फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील फोन खेचून घेऊन जात होते. गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घडलेल्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त करून गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेटी दिल्या. यावेळी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती मिळवून भारत प्रल्हाद राठोड (वय १९ राहणार आर. ३, करंजाडे), देवानंद विष्णू जाधव (वय १९, राहणार विठ्ठल भोईर यांची चाळ, कळंबोली), दीपक रमेश राठोड (वय १९, राहणार गणपती विसर्जन तलावाजवळ, खिडुकपाडा) आणि वैभव किसन जगताप (वय २४, राहणार वीर हॉस्पिटल, खांदा कॉलनी) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार ७०० किमतीचे २९ मोबाइल फोन व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली.
येथील गुन्हे झाले उघड
आरोपींना अटक झाल्यामुळे पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे दोन, कामोठे पोलिस ठाण्याचे पाच, तळोजा पोलिस ठाण्याचे पाच, पनवेल शहर पोलिस ठाण्याचा एक, खांदेश्वर पोलिस ठाण्याचा एक, कळंबोली पोलिस एक, खारघर पोलिस एक, सीबीडी पोलिस एक असे सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत.