Proximity to 'lockdown' increases 'distance' in Family, 208 complaints to police after unlocking | ‘लॉकडाऊन’मधल्या जवळिकीने वाढला ‘दुरावा’, अनलॉक होताच पोलिसांकडे २०८ तक्रारी 

‘लॉकडाऊन’मधल्या जवळिकीने वाढला ‘दुरावा’, अनलॉक होताच पोलिसांकडे २०८ तक्रारी 

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई -  लॉकडाऊनमध्ये पती- पत्नीमधील वाढलेला सहवास वेगवेगळ्या वादाला कारणीभूत ठरला आहे. या कालावधीत घडणाऱ्या गोष्टी एकमेकांविरोधात संशय निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे अनलॉक होताच, पती-पतीमधील कलहातून पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशभरात लॉकडाऊन  लागू असताना, तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक जण घरात बंदिस्त होता. यादरम्यान अनेक दाम्पत्यांना प्रथमच एकमेकांना एवढा वेळ देता आला, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त लाभलेला हा सहवास काही दाम्पत्यांच्या संसारात काडी टाकणारा ठरला आहे. या कालावधीत पती किंवा पत्नीवर संशय  निर्माण करणाऱ्या  घटना अनेकांच्या घरात घडल्या आहेत. त्यात स्मार्टफोनही  तितकाच कारणीभत ठरल्याचे  काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. अमूक एक गोष्ट आजवर माझ्यापासून का लपवली?  यापासून ते एकमेकांचे  मित्र-मैत्रिणी खटकण्यापर्यंतच्या  कारणांचा त्यात समावेश आहे. विविध कारणांनी कित्येक दाम्पत्यांचा लॉकडाऊनचा कालावधी आपापसात भांडणातच गेला आहे.

परिणामी, काही केल्या आपसात पटत नसल्याने अनलॉक होताच, अशा पती-पत्नींनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे, तसेच महिला सहायता कक्षाकडे धाव घेतली आहे. लॉकडाऊन संपताच नवी मबई पोलिसांच्या महिला सहायता कक्षाकडे कौटुंबिक कलहाच्या २०८ तक्रारी प्राप्त झालया आहेत. त्यापैकी ८८ तक्रारी गत कालावधीत निकाली काढण्यात आल्या असून, त्यामधील १५ दाम्पत्यांनी पुन्हा जमवून घेतले आहे, तर ९ प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित १२० तक्रारींवर अद्याप सुनावणी सुरू आहे.

Web Title: Proximity to 'lockdown' increases 'distance' in Family, 208 complaints to police after unlocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.