Project victims march to CIDCO, invading airport-bound villagers | प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. विमानतळ प्रकल्पासाठी आपली गावे आणि वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सिडकोकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला.
आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. २०२१ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पबाधित गावांचे काही प्रश्न अद्यापि धुमसत आहेत. त्यामुळे दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले असले, तरी उर्वरित गणेशपुरी, उलवे तरघर व कोंबडभुजे या चार गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. याचा परिणाम म्हणून या गावांच्या गावठाणाबाहेरील बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामस्थांनी आपली बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा सिडकोच्या माध्यमातून ती पाडून टाकली जातील, असा इशारा या नोटिसाद्वारे देण्यात आला आहे. सिडकोच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद या चार गावांतील ग्रामस्थांत उमटले आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी तिरडी मोर्चा काढून सिडकोच्या उदासीनतेचा प्रतिकात्मक निषेध केला. मोर्चात चार गावांतील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने दहा गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. मात्र, पुनर्वसनाबाबत सिडकोकडून कार्यवाही होताना दिसत नाहीत. जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधील अनेक गोष्टींना बगल दिली जात आहे. ज्या गावांत मासेमारी केले जाते, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापि अधांतरी आहे. उद्याने, क्रीडांगणे, शाळा, समाजमंदिरे, स्मशानभूमी आदी सुविधांबाबत सिडकोकडून कार्यवाही केली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
>वाघिवली गावाच्या स्थलांतराची घाई नाही
तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा अशी स्थलांतरित झालेल्या नऊ गावांची नावे आहेत. या यादीतील वाघिवली हे दहावे गाव आहे. वाघिवली हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राबाहेर असल्याने त्याच्या स्थलांतराची सध्या सिडकोला घाई नाही, असे असले तरी या गावातील ग्रामस्थांनाही पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. भविष्यात वाघिवली गावाच्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याची सिडकोची योजना आहे.
>सिडकोच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना चांगलाच अनुभव आहे. ५० वर्षे उलटली तरी साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप सुरूच आहे. सिडकोच्या या दिरंगाईचा फटका अनेक प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. विमानतळबाधित गावांच्या पुनर्वसनावर अद्यापि कार्यवाही सुरू नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ही वस्तुस्थिती असताना प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्याचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला आहे.
- अ‍ॅड. प्रशांत भोईर,
अध्यक्ष, नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती

Web Title: Project victims march to CIDCO, invading airport-bound villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.