वनमंत्र्यांच्या वन्यप्राणीप्रेमावरून राजकारण तापले; शिंदेसेनेचा कोर्टात जाण्याचा मंत्री नाईक यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:32 IST2025-10-15T09:31:52+5:302025-10-15T09:32:37+5:30
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवारी आयोजित राज्य मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नाईक यांनी “काही वर्षांपूर्वी माझ्याकडे हरीण होते.

वनमंत्र्यांच्या वन्यप्राणीप्रेमावरून राजकारण तापले; शिंदेसेनेचा कोर्टात जाण्याचा मंत्री नाईक यांना इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : माझे प्राण्यांवर प्रेम आहे. माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्ले होती. त्यांना खूप जपले. पण, जंगलातील प्राण्यांना पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे वनमंत्री झाल्यानंतर समजले, हे वनमंत्री गणेश नाईक यांचे वक्तव्य माध्यमात व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईतील वातावरण तापले आहे. याप्रकरणी शिंदेसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवारी आयोजित राज्य मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नाईक यांनी “काही वर्षांपूर्वी माझ्याकडे हरीण होते.
एकाने आणून दिल्यावर त्याची मी काळजी घेतली होती. तसेच, एक बिबट्याचे पिल्लूही माझ्याकडे आले होते. त्याचीही मी खूप काळजी घेतली. मात्र, वनमंत्री झाल्यावर कळले की, वन्यप्राण्यांना घरी ठेवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा जंगलात सोडले होते,’’ असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर गदारोळ झाला.
वाशीत सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक अनंत सुतार, मुनावर पटेल यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला
शिंदेसेनेच्या या पवित्र्यानंतर गणेश नाईक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. अनेक वेळा शेतात वन्यप्राणी येतात. काही जखमी असतात. अशावेळेस त्यांना दयाभाव दाखवून रेस्क्यु सेंटरमध्ये सोडून द्यावे, प्राण्याची याेग्य जागा नैसर्गिक अधिवास आहे, माझ्याकडे कोणीही कधीही कोणत्याही प्रकारचे प्राणी ठेवले नव्हते, ते जंगलातच सुरक्षितच असतात, त्यांच्या रक्षणासाठी शासनाने आखलेल्या नियमांचे पालन व्हायला हवे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
शिंदेसेना कोर्टात जाणार
गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर शिंदेसेनेचे बेलापूर जिल्हाप्रमुख किशाेर पाटकर यांनी ही बाब गंभीर आहे. यामुळे वकिलांशी बोलून मी कोर्टात जाणार आहे. नाईक यांना ही पिल्ले कोणी आणून दिली, त्यांनी ती कोठे सोडली, याची माहिती मिळण्यासाठी मी कोर्टात जाणार अशी माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी व वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणीही पाटकर यांनी केली आहे.
जंगलातील प्राणी पाळणे गुन्हा
जंगलातील प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, या नियमांमुळेच माणसाच्या प्राणिप्रेमाला योग्य दिशा मिळते. अन्यथा हरीण, मोर, बिबटे अशा अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले असते, असेही त्यांनी या मेळाव्यात स्पष्ट केले.