पोलिसांचे दंगा काबू अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:49 IST2019-09-01T01:49:43+5:302019-09-01T01:49:48+5:30
नागरिकांनाही दक्षतेचे आवाहन । मॉकड्रिलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पोलिसांचे दंगा काबू अभियान
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय क्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी ‘दंगा काबू’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून दोन दिवसांमध्ये तीन ठिकाणी मॉकड्रिलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ चे उपआयुक्त पंकज डहाणे, परिमंडळ-२ चे उपआयुक्त अशोक दुधे व इतर अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून सीवूडमधील ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमध्ये शुक्रवारी मॉकड्रिल घेण्यात आले. मॉलमध्ये अतिरेकी घुसले असल्याची माहिती वायरलेसवरून सर्व पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व इतर सर्व यंत्रणांना देण्यात आली. रुग्णवाहिका, पोलीस, कमांडो, अग्निशमन यंत्रणा किती वेळात पोहोचली याची नोंद घेण्यात आली. बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु मॉकड्रिल असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमधील या मॉकड्रिलची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. पनवेलमध्येही अशाच प्रकारे प्रयोग करण्यात आला होता.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या व हाउसिंग सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठकही घेण्यात आली आहे. सागरीकिनाºयालगत गावामधील नागरिकांच्या बैठकाही घेण्यात आल्या. शांतता कमिटी, मॉल, सिनेमा हॉल व औद्योगिक आस्थापनांचे मालक या सर्वांना काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. शहरातील सुरक्षारक्षकांनाही नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. सागरी कवच व संयुक्त ट्रिगल अभियान राबविण्यात येत आहे. खाडीकिनाºयाजवळील सर्व लॅण्डिंग पॉइंट, सागरी चेक पोस्ट, जेट्टी व इतर ठिकाणीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली जात असून नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उरणमध्येही मॉकड्रिल
उरणमधील पेन्शनर पार्क परिसरामध्ये पोलिसांनी मॉकड्रिलचे आयोजन केले होते. दोन गटांमध्ये मारामारी झाली असल्याचे भासविण्यात आले होते. उरण अग्निशमन दलाचे कर्मचारी, उरण पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी, २६ कर्मचारी, जेएनपीटी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज भद्रेही तत्काळ घटनास्थळी उपस्थित राहिले.
पोलीस आयुक्त, सहआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही परिमंडळचे उपआयुक्त व इतर सर्व अधिकाºयांनी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून नवी मुंबई व पनवेलमध्ये मॉकड्रिलचे आयोजन केले होते. सुरक्षा व्यवस्था व इतर यंत्रणा किती दक्ष आहे याची पाहणी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
- सुरेश मेंगडे, उपआयुक्त,
विशेष शाखा
उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ व परिमंडळ-२ मध्ये गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही सुरक्षेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंडपामध्ये व परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.