नवी मुंबईत बारवाल्यांना पोलिसांनी दिला दणका; पाच ठिकाणी कारवाया, ४६ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:47 IST2025-08-09T09:46:34+5:302025-08-09T09:47:18+5:30
वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व महिला वेटर तोकड्या कपड्यांमध्ये उपस्थित राहून बीभत्स हावभाव करत असल्याचा ठपका ठेवून एकूण ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नवी मुंबईत बारवाल्यांना पोलिसांनी दिला दणका; पाच ठिकाणी कारवाया, ४६ जणांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई : रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या व ग्राहकांशी बीभत्स वर्तन करणाऱ्या बारबाला असलेल्या बारविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील पाच बारवर कारवाई करून ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संतोष पॅलेस बारवर पोलिसांनी ७ ऑगस्टला कारवाई केली. बारमध्ये महिला वेटर ग्राहकांशी बीभत्स वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. रात्री दहानंतरही बार सुरू असल्यामुळे व तेथे नियमबाह्य कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर २ मधील साई दरबार हॉटेलमध्येही महिला वेटर बीभत्स वर्तन करताना आढळल्या. या प्रकरणी व्यवस्थापक, वेटरसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तसेच नेरूळ सेक्टर १ मधील भारती बारमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल. याशिवाय कोपरखैरणे सेक्टर २ मधील व्हिलेज हट रसिला बारवर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. येथील व्यवस्थापकांसह एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कारवाईचा इशारा -
सीबीडी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील सेक्टर ११ येथील मेघराज बार ७ ऑगस्टला मध्यरात्री १ नंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व महिला वेटर तोकड्या कपड्यांमध्ये उपस्थित राहून बीभत्स हावभाव करत असल्याचा ठपका ठेवून एकूण ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
एकाच दिवशी ५ बारवर कारवाई
केली असून ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.