दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:56 IST2025-10-08T17:54:53+5:302025-10-08T17:56:55+5:30
PM Modi DB Patil Navi Mumbai International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी दि.बा. पाटील यांच्या कार्यालाही उजाळा दिला.

दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
PM Modi DB patil Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी दि.बा. पाटील यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज या मोठ्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे पुत्र, लोकनेते दि.बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवेच्या भावनेतून काम केले ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नेहमी प्रेरणा देत राहील."
"तुम्ही मागील ११ वर्षाच्या कामावर नजर टाकली, तर संपूर्ण देशात वेगाने काम सुरू आहे. वंदे भारत एक्स्प्रेस वेगाने धावत आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. मोठंमोठे महामार्ग सुरू झाले आहेत. यातून भारताची गती आणि प्रगती दिसते", असे मोदी म्हणाले.
महाविकास आघाडीवर टीकेचे बाण
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमुळे मुंबईतील मेट्रो कामे रेंगाळल्याचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, "विकासाच्या कामात अडथळे आणणारीही विचारधारा आहे. देशाने असे नुकसान बघितले आहे. आज ज्या मेट्रो लाईनचे उद्घाटन झाले आहे, ते या लोकांच्या कारनाम्यांचीही आठवण करून देते."
"मी मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आलो होतो. त्यावेळी मुंबईतील लाखो लोकांना आशा होती की, त्यांचा त्रास कमी होईल. पण, मध्ये काही काळासाठी जे सरकार आले (महाविकास आघाडी), त्या सरकारने हे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली, पण देशाचे हजारो कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. किती वर्षे असुविधा राहिली. आता मेट्रो मार्ग बनल्यामुळे दोन-अडीच तासांचा प्रवास तीस-चाळीस मिनिटांत होईल", असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण डागले.