'सॉरी बेबी'; अविवाहित जोडप्याने नवजात बाळाला सोडलं होतं अनाथाश्रमाबाहेर, पोलिसांनी असं शोधून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:09 IST2025-07-01T20:06:59+5:302025-07-01T20:09:48+5:30
नवी मुंबईत नवजात बालकाला आश्रमाबाहेर सोडणाऱ्या जोडप्याचा शोध पोलिसांनी लावला आहे.

'सॉरी बेबी'; अविवाहित जोडप्याने नवजात बाळाला सोडलं होतं अनाथाश्रमाबाहेर, पोलिसांनी असं शोधून काढलं
Navi Mumbai Crime: नवी मुंबईच्या पनवेल परिसरात दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हे नवजात अर्भक एका बास्केटमध्ये ठेवण्यात आले होते. त्या बास्केटमध्ये दुध पावडर, दुधाची बाटली आणि एक चिट्ठीही ठेवण्यात आली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांनी २४ तासांच्या आत महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. अवविवाहित जोडप्याने या बाळाला जन्म दिल्यानंतर एका आश्रमाजवळ सोडून दिलं होतं. यासोबत ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये सॉरी असं लिहीलं होतं.
नवी मुंबईतील एका विवाहित जोडप्याने त्यांच्या नवजात बाळाला अनाथाश्रमाजवळ सोडून दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडलली होती. सोबत एक चिठ्ठी होती ज्यावर, "सॉरी बेबी" असं लिहीलं होतं त्यांना भीती होती की समाज त्यांना नावं ठेवेल. शनिवारी सकाळी पनवेलमधील एका अनाथाश्रमाच्या बाहेर फुटपाथवर हे नवजात बाळ आढळलं होतं. बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातल्या चिठ्ठीमध्ये "बाळा तुला सोडून गेल्याबद्दल माफ कर. आम्ही तुला वाढवायला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तयार नाही. आम्ही तुझ्याभोवती राहू आणि कदाचित एक दिवस तुला घेऊन जाण्यासाठी येऊ. आता तुला इथे सोडल्याबद्दल माफ कर," असं म्हटलं.
गुन्हा दाखल केल्यानंतर, पोलिसांनी रविवारी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि बालकाच्या पालकांचा शोध घेतला. पोलिसांनी मुलाचे वडील अमन कोंडकर याला शोधून काढले जो भिवंडीचा रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे आणि तो बेरोजगार आहे. त्याने पोलिसांना सांगितले की त्याचे मुंब्रा येथे राहणाऱ्या नात्यातील एका २० वर्षीय तरुणीवर प्रेम होते. कुटुंबियांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. तरुणी- गर्भवती राहिली आणि मुंब्रा येथील एका खाजगी रुग्णालयात तिने मुलाला जन्म दिला. या जोडप्याने रुग्णालयात लग्न झाल्याचा दावा केला होता.
हे जोडपे एका कारमधून तिथे आले होते, ज्यामुळे पोलिसांना त्यांच्या वाहनाचा नंबर मिळाला आणि त्यांचा शोध घेण्यात मदत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखा घातलेली एक महिला स्वप्नील बालिका अनाथाश्रमाच्या बाहेर फूटपाथवर प्लास्टिकच्या टोपलीत मुलाला सोडताना दिसत होती. सध्या त्या मुलाची काळजी एका धर्मादाय ट्रस्टकडून घेतली जात आहे. मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवायचे की नाही हे राज्य बाल कल्याण समिती ठरवेल, असं पोलिसांनी सांगितले.