पनवेल, उरणला पुराचा धोका; भरतीमुळे सीबीडी परिसर जलमय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 06:10 IST2019-06-04T23:25:37+5:302019-06-05T06:10:57+5:30
अचानक पाणी कोठून आले हे समजले नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील इमारतीमधील कर्मचारीही काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरले होते.

पनवेल, उरणला पुराचा धोका; भरतीमुळे सीबीडी परिसर जलमय
नामदेव मोरे
नवी मुंबई : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ºहास सुरू झाला असून, भविष्यात नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसराला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी भरतीचे पाणी सीबीडी सेक्टर ११ मध्ये आल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता. रस्त्यावर एक फूट पाणी साचल्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. भविष्यातील धोक्याची ही सूचना असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
सीबीडी सेक्टर ११ मधील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयापासून ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत दुपारी १२.३० वाजता अचानक रस्त्यावर पाणी येऊ लागले. पाण्याची पातळी वाढून काही वेळामध्ये रस्त्यावर एक फूट उंचीपर्यंत पाणी जमा झाले.
अचानक पाणी कोठून आले हे समजले नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील इमारतीमधील कर्मचारीही काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरले होते. अचानक रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीलाही अडथळा
निर्माण झाला होता. अर्धा तास या रस्त्यावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती.
महापालिकेची जलवाहिनी फुटली असण्याची शक्यता वाटल्यामुळे अनेकांनी पालिका प्रशासनास फोन करण्यास सुरुवात केली होती. याविषयी सविस्तर माहिती घेतल्यानंतर जलवाहिनी फुटली नसून भरतीचे पाणी रस्त्यावर आल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी ४.६४
मीटर एवढी भरतीची पातळी असल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली. सीबीडीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे या परिसरातील कर्मचाऱ्यांना इमारतीच्या गेटवरून व दुभाजकावरून चालण्याची वेळ आली होती.
सीबीडी परिसरामध्ये भरतीचे पाणी शिरले ही भविष्यातील धोक्याची सूचना आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला पर्यावरणाचा ºहास थांबविला पाहिजे. होल्डिंग पॉण्डमधील गाळ काढला पाहिजे. नैसर्गिक नाले व खाडीकिनाºयावर डेब्रिजचा सुरू असलेला भराव थांबला पाहिजे. - आबा रणावरे, पर्यावरणप्रेमी
उरण परिसरात सेझ व महामार्गाच्या कामासाठी साडेचार हेक्टर जमिनीवरील ४५०० खारफुटीचे वृक्ष नष्ट करण्यात आले आहेत. कुंडे परिसरामध्ये फेब्रुवारीमध्ये २५ घरांमध्ये पाणी शिरले होते. निसर्गाचा ºहास थांबला नाही, तर भविष्यात परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. - बी. एन. कुमार, संचालक, नेचर कनेक्ट
कुंडेमध्येही शिरले पाणी
भरतीचे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. फेबु्रवारीमध्ये उरण तालुक्यामधील कुंडे गावामधील घरांमध्ये पाणी शिरले होते. १५ वर्षांमध्ये प्रथमच या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. निसर्गाच्या होत असलेल्या ºहासामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
होल्डिंग पॉण्डचे अस्तित्व धोक्यात
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भरतीचे पाणी शहरात शिरू नये यासाठी शहरात ११ होल्डिंग पॉण्ड तयार करण्यात आले आहेत. 200 हेक्टर क्षेत्रफळावर हे होल्डिंग पॉण्ड आहेत. सद्यस्थितीमध्ये होल्डिंग पॉण्डमध्ये गाळ साचला आहे. खारफुटीमुळे गाळ काढता येत नसून, त्या ठिकाणची पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. प्रशासनाने न्यायालयाची परवानगी मिळवून लवकरात लवकर हे काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
खारफुटी संरक्षण भिंतीचे काम करत असते. यामुळे त्सुनामी व भरतीचे पाणी शहरात येत नाही. याशिवाय हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासही मदत होते; परंतु दुर्दैवाने नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार घडत आहेत. - सुकुमार किल्लेदार,अध्यक्ष, सेव्ह मँग्रोव्हज अॅण्ड नवी मुंबई एक्झिस्टन्स (सामने)
नवी मुंबई सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते; परंतु या ठिकाणीही भरतीचे पाणी सीबीडीसारख्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आल्यामुळे नियोजन चुकल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी वाशी सेक्टर १७ मध्येही भरतीचे पाणी शिरल्याची घटना घडली होती.
भविष्यातील संकटाची ही चाहूल असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल केली जात आहे. खाडीकिनारी व नैसर्गिक नाल्यामध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात
आहे.
पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी टेकडीचे सपाटीकरण केले असून उलवे नदीचे पात्र बदलण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील गावांत पाणी शिरण्याची शक्यता आहे. उरण तालुक्यामध्ये सेजच्या कामासाठीही मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केली जात आहे. निसर्गाशी सुरू असलेला खेळ नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या पर्यावरणाचा ºहास थांबविला नाही तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.