नवी मुंबईत पोलीस हवालदाराची हत्या; आरोपी मृतदेह रेल्वे समोर फेकून फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:21 IST2025-01-03T19:19:41+5:302025-01-03T19:21:43+5:30
नवी मुंबईत एका रेल्वे पोलीस हवालदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

नवी मुंबईत पोलीस हवालदाराची हत्या; आरोपी मृतदेह रेल्वे समोर फेकून फरार
Navi Mumbai Cirme: मुंबई आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बुधवारी पहाटे नवी मुंबईत गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस दलातील ४२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलची दोन अज्ञात व्यक्तींनी गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हवालदाराला रेल्वेसमोर फेकून दिलं. पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. मात्र अद्यापही आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विजय रमेश चव्हाण यांच्या शरीरावर आढळून आल्या आहेत ज्यावरून गळा दाबून त्यांची हत्या केल्याचे दिसत आहेत. तसेच त्यांच्या डोक्यावरही जखमा आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे ५.२५ ते ५.३२ च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांना रेल्वे ट्रॅकवर ढकलून दिलं होतं.
मोटरमनने सर्वात आधी रेल्वे कंट्रोलला ही माहिती दिली. रेल्वे कंट्रोलने ही माहिती रेल्वे पोलीस कंट्रोलला पाठवली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांना चव्हाण हे दोन रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रुळाजवळ बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी चव्हाण यांना वाशी नगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पनवेल जीआरपीमध्ये तैनात असलेले चव्हाण हे मूळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून ते नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाडी परिसरात राहत होते. ही घटना घडली त्यावेळी चव्हाण हे कर्तव्यावर नव्हते आणि साध्या वेशात होते. चव्हाण हे दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दोन्ही आरोपींनी त्यांना जास्त प्रमाणात दारु पाजली आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. रबाळे रेल्वे स्थानकाजवळील एका भागातून ते रेल्वे रुळाच्या परिसरात गेले आणि नंतर आरोपींनी त्यांना लोकल ट्रेनसमोर फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात असून त्यांचा चव्हाण यांची हत्या करण्यामागचा हेतू देखील स्पष्ट झालेला नाही. चव्हाण यांचा मोबाईल सापडला असून त्यांनी शेवटचा कॉल कोणाला केला होता आणि त्यांच्यासोबत शेवटी कोण होते याचा तपास पोलीस करत आहेत.
रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलिस पथके दोन्ही रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासत आहेत. पोलिसांचे पथक जवळच्या भागातील बार आणि परमिट रूमचीही चौकशी करत आहेत. पोलिसांकडून वेगवेगळ्या बाजूने तपास केला जात आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय च्या कलम १०३ (१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.