Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:50 IST2025-09-10T11:48:54+5:302025-09-10T11:50:47+5:30
Navi Mumbai Crime: आरोपी मूळ गावी गेलेला नव्हता आणि तो मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते.

Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
नवीन पनवेल : खुनाच्या गुन्ह्यातील सहा वर्षांपासून फरार आरोपीला कामोठे पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. मनोहर यशवंत सरोदे (५०) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
कामोठे पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती मनोहर तिला मारहाण करत असे.
डिसेंबर २०१९ मध्ये आरोपी मद्य पिऊन चिकन घेऊन आला होता. त्यावेळी ताटात चिकन कमी आले म्हणून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून त्याने पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो पळून गेला होता.
त्याच्या मूळ गावी पोलिस पथके पाठवून तपास केला. मात्र, आरोपी मूळ गावी गेलेला नव्हता आणि तो मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले.
खोट्या नावाने वास्तव्य
आरोपी हैदराबाद, तेलंगणा येथे असून, नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुप्त माहिती काढून आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपीची माहिती प्राप्त केली. यावेळी तो हैदराबाद येथे जहांगिराबाद येथे खोट्या नावाने राहत असल्याची माहिती मिळाली.
कामोठे पोलिसांनी पथक तयार करून त्याचा शोध घेतला. यावेळी बगलागुंडा या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी मनोहर हा पिंटू कुमार या खोट्या नावाने राहत होता. त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.