आखातातील युद्धामुळे कांद्याने रडवले; आवक दुप्पट, भाव कमी होण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:09 IST2026-03-10T09:08:16+5:302026-03-10T09:09:02+5:30
आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे.

आखातातील युद्धामुळे कांद्याने रडवले; आवक दुप्पट, भाव कमी होण्यास सुरुवात
नवी मुंबई : आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे. निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक मार्केटमधील आवक प्रचंड वाढू लागली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये मागणीपेक्षा दुप्पट आवक होऊ लागली असून, बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आवक अशीच सुरू राहिली तर पुढील आठवड्यात दर घसरून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ८०० ते ९०० टन कांद्याची गरज असते; परंतु सोमवारी एकाच दिवशी १,५५१ टन कांद्याची आवक झाली आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे शेतकरी माल बाजार समितीमध्ये पाठवू लागले आहेत.
बाजार समितीमध्ये ८ ते १५ रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर ७ ते १४ रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारातही कांदा १५ ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. निर्यात सुरू झाली नाही तर आवक वाढून दर अजून घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन कांद्याची आवकही सुरू झाली असल्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
अशोक वाळुंज, संचालक,
मुंबई बाजार समिती.
१८ रुपये किलोने विक्री
सोमवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक ४,१२३ टन आवक झाली आहे. खराब कांदा १ रुपया किलोपासून चांगला कांदा १८ रुपये किलोने विकला गेला.
मालेगाव, मुंगसे व पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्येही एकाच दिवशी २ हजार टनपेक्षा जास्त आवक झाली आहे. कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.