आता प्रतीक्षा विमानोड्डाणाची, मुहूर्त कधी डिसेंबर की जानेवारीत? महामुंबईकरांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:03 IST2025-10-09T10:03:29+5:302025-10-09T10:03:44+5:30
११६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधानांनी केले.

आता प्रतीक्षा विमानोड्डाणाची, मुहूर्त कधी डिसेंबर की जानेवारीत? महामुंबईकरांची उत्सुकता शिगेला
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गेल्या २८ वर्षांपासून पाहिले गेलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न अखेर आज ८ ऑक्टोबरला सत्यात उरतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देखणा विमानतळ देशाला अर्पण केला असला तरी येथून विमान प्रवास करण्यासाठी महामुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तो काळ किमान दोन ते अडिच महिने असू शकतो, असे स्पष्टीकरण या विमानतळाचे संचालन करणाऱ्या अदानी विमानतळ कंपनीने आधीच दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विमानोड्डाणाचा मुहूर्त कधी, डिसेंबर की जानेवारी, याची उत्सुकता आहे.
११६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधानांनी केले. पहिल्या टप्प्यात एक धावपट्टी, एक टर्मिनल इमारत, १० बस गेट आणि २८ एरोब्रिज खुले करण्यात येणार आहेत. मात्र, अद्यापही विमानोड्डाणासाठी आवश्यक काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विमानतळाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अदानी एअरपोर्ट कंपनीचे सीईओ अरुण बन्सल यांनी, उद्घाटनानंतर विमानतळाचा ताबा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे. त्यांची कामे ४० ते ४५ दिवस चालणार आहेत, असे सांगितले.
इमिग्रेशन, सीमा शुल्कची कामे प्रलंबित
सीमाशुल्क आणि इमिग्रेशनची संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी नवी मुंबई पोलिसांनी २८५ कर्मचारी दिले होते. मात्र, त्यांना स्थगिती मिळाली आहे. यामुळे त्यांचे प्रशिक्षणच अद्याप झालेले नाही. शिवाय आयत्या वेळेस काही अडथळे आल्यास आणखी उशीर होऊ शकतो, किंवा विमानोड्डाण पुढे मागे होऊ शकते. हा मुहूर्त डिसेंबरमध्ये असेल की जानेवारीत, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.