मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईकर सज्ज, २५ तारखेला मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:16 IST2024-01-19T13:16:27+5:302024-01-19T13:16:46+5:30
बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुक्कामासाठी तीन जागांच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली.

मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईकर सज्ज, २५ तारखेला मुक्काम
नवी मुंबई : आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा २६ जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार आहे. २५ तारखेला आंदोलक नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार असून त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुक्कामासाठी तीन जागांच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली.
राज्यातील मराठा समाजामधील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान २५ जानेवारीला आंदोलक नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. या सर्व आंदोलकांना जेवण, पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चासह सर्व संघटना प्रयत्नशील राहणार आहेत.
वास्तव्यासाठी तीन जागांवर चर्चा
मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बुधवारी घणसोलीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांना कुठे वास्तव्य करता येईल या ठिकाणांवरही चर्चा करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र व गणपतशेठ तांडेल मैदानाच्या पर्यायांवरही चर्चा करण्यात आली.
स्वच्छतेकडेही लक्ष
सर्व मराठा समन्वयक, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शक्य ते योगदान देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे.
आंदोलकांसाठी वैद्यकीय सुविधा, शौचालय, जेवण, पाणी व इतर सोय करण्यासाठी विविध पथके तयार केली जाणार आहेत. साफसफाईवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक आयोजित करून आवश्यक ती नियोजनाचा आराखडा तयार करून सर्वांना जबाबदारीचे वितरणही केले जाणार आहे.