लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेतील पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता सीवूड येथील पोद्दार शाळेत घडली. या घटनेची एनआरआय पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलिस तपास करत आहेत.
आयसीएसई बोर्डाच्या नववीत शिकणारा विद्यार्थी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शाळेत आला होता. दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या वर्गात जाऊन बॅग ठेवून तो पाचव्या मजल्यावरील कैटीनकडे गेला होता. तिथूनच त्याने विलमधील मोकळ्या जागेतून बाहेर येऊन खाली उडी मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या चौकशीत दोन विद्यार्थिनींनी त्याला कैंटीनकडे जाताना पाहिल्याचे सांगितले आहे, तर कैंटीन साडेसात वाजल्यानंतर उपद्धत असल्याने तो गेला त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. शिवाय शाळेचे छत व इतर उघड्या ठिकाणी ग्रिल असून एकमेव कैटीनच्या ठिकाणी जाळी थोडी उघडी होती. त्या ठिकाणावरून त्याने उघड्या जागेकडे प्रवेश करून उडी मारल्याचे सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले.
सीसीटीव्हीत एकटाच दिसून आला
मुलगा पाचव्या मजल्यावर एकटा जाताना सीसीटीव्हीत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, याचा उलगडा होऊ शकला नसून, या संदर्भात पालकांकडे व शाळेत चौकशी केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
कौटुंबिक वाद की शिक्षणाचे ओझे?
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जाणार आहे.
- त्याचा कुटुंबात काही वाद झाला होता का? की अभ्यासाचा तणाव होता,
- याबाबत पालक व शाळेत चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.