टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 08:21 IST2025-09-10T08:19:52+5:302025-09-10T08:21:09+5:30
मारहाणीत राजेश जेजुरकर व आकाश नवघणे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
नवी मुंबई : जुन्या वादातून गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये सशस्त्र हल्ल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली आहे. हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरात ही घटना घडली. राजेश जेजुरकर व गोरख म्हात्रे या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा त्या ठिकाणी वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही टोळ्या पूर्वतयारीत असल्याने त्यांनी एकमेकांवर तलवार, कोयत्यांनी हल्ला चढवला.
मारहाणीत राजेश जेजुरकर व आकाश नवघणे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी गोरख म्हात्रे व राजेश जेजुरकर या दोघांसह त्यांच्या साथीदारांवर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी हर्षद भोसले, गोरख म्हात्रे व राज राय या तिघांना अटक केली असून, इतरांचाही शोध सुरू आहे.
राजकुमार म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे आमने-सामने
पनवेल : एकेकाळी पनवेलमध्ये दहशत असलेला कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रे याला स्वतःच्या खुटारी गावातील अनिकेत म्हात्रे याने मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. खुटारी गावात घडलेल्या हाणामारीबाबत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारा अनिकेत म्हात्रे हा 'गोल्डन मॅन' म्हणून परिचित असून, या घटनेनंतर तो फरार झाला आहे.
राजकुमार म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, अनिकेत एकनाथ म्हात्रे आणि घटनेतील जखमी राजकुमार म्हात्रे यांच्यात जुना वाद आहे. ६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास अनिकेत म्हात्रे १५ साथीदारांसह आणि राजकुमार म्हात्रे हे दोघे खुटारी गावाजवळ समोरासमोर आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
राजकुमार म्हात्रे याच्यासमोर अनिकेतने बंदूक काढून हवेत दोन फैरी झाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या मारहाणीत बंदूक, तलवार तसेच हॉकी स्टिकचा वापर करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या राजकुमार म्हात्रेला उपचारासाठी पनवेलमधील प्राचीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.