रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चौघांना अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 17, 2024 17:37 IST2024-01-17T17:36:18+5:302024-01-17T17:37:19+5:30
रेल्वेत, स्थानकात करायचे चोरी.

रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चौघांना अटक
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : रेल्वे पोलिसांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ स्थानकात एका चोरट्याला पकडल्यानंतर अधिक तपासात पोलिसांनी त्याच्या इतर तिघा साथीदारांनाही अटक केली आहे. त्यामध्ये तिघे नेरुळचे तर एकजण पनवेलचा राहणारा आहे. रेल्वे स्थानकात, आडोशाच्या जागी तसेच धावत्या रेल्वेत ते मोबाईल चोरी करायचे.
ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेत तसेच फलाटावर उभ्या असलेल्या प्रवास्यांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी नेरुळ स्थानकात फलाटावर फोनवर बोलत उभ्या असलेल्या फैजल शेख (२५) या प्रवास्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न दोघांनी केला होता. यावेळी त्याने इतर प्रवास्यांच्या मदतीने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार हाती लागलेल्या चोरट्याद्वारे टोळीच्या मुसक्या आवळण्याचे काम वाशी रेल्वे पोलिसांनी केले आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक कृष्णा पाटोळे, दत्तात्रय बदाले, हवालदार सुनील पाटील, अनंता जावळे, कपिल देशमुख आदींचे पथक केले होते. त्यांनी हाती लागलेल्या करण लष्करे याच्याकडी अधिक चौकशी करून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवली. त्यामध्ये योगेश अंबरे, मारुती यल्लापा पवार, मारुती साहेबराव पवार हे तिघेही हाती लागले. त्यापैकी योगेश हा पनवेलचा राहणारा असून इतर तिघे नेरुळचे राहणारे आहेत. त्यांनी केलेले मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये जुईनगर, सानपाडा व नेरुळ स्थानकात घडलेले गुन्हे आहेत. अटक केलेल्या चौकडीकरून चोरीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.