नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:50 IST2025-10-03T18:14:30+5:302025-10-03T18:50:40+5:30
भिवंडीचे खासदार सुरेश बाळ्या म्हात्रे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या विमानतळाच्या लोकार्पणास उपस्थित राहणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून कित्येक महिन्यांपासून करण्यात येत होती. अखेर या विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्रांचा आणि दि.बा. समर्थकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून लढा सुरु आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या आंदोलनाला यश आल्याचे सांगत मुख्यमंत्री व पंतप्रधान दोघांनीही दि.बां. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यास दर्शवली सहमती दर्शवल्याचे म्हटलं.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले की या विमानतळासाठी एकच नाव पाठवण्यात आले आहे. आम्ही विमानतळाला तेच नाव देणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाचा विषय देखील होता. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. तसेच या संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारकडे देण्यात येतील. या संदर्भातील ठराव मंजूर होऊन राज्याला तो अधिकार दिला जाईल. त्या कामासाठी जो वेळ लागेल त्यानुसार हे नाव देण्यात येईल. परंतु अंतिम नाव हे दि. बा. पाटील यांचेच असणार आहे," असं सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून एअरोड्रोम परवाना मिळाला. कडक सुरक्षा आणि नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर हा परवाना मिळाला. त्यामुळे विमानसेवा सुरु करण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला.