पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा

By नामदेव मोरे | Published: April 18, 2024 06:13 PM2024-04-18T18:13:17+5:302024-04-18T18:13:31+5:30

डेब्रीज माफियांकडूनही अतिक्रमण सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष

Navi Mumbai Incidents of unauthorized felling of trees in the city | पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा

पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा

नवी मुंबई : शहरात अनधिकृत वृक्षतोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पामबीच रोडवर सारसोळे खाडीकिनारी असलेल्या भुखंडावरील वृक्षही तोडले जात आहेत. या परिसरामध्ये मद्यपींसह, गर्दुल्यांचे अड्डे तयार झाले आहेत. डेब्रीज माफियाही मोकळ्या जागेत भराव करू लागले आहेत. पर्यावरणाची हानी होत असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

पामबीच रोडवरील टी एस चाणक्य येथे खारफुटीच्या वृक्षाची कत्तल केल्याची घटना ताजी असताना शहरात इतर ठिकाणीही वृक्षतोडीच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. महामार्गावरील नेरूळ एलपी पुलाजवळील पदपथाच्या जवळील वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. आता पुन्हा पामबीच रोडवरील सारसोळे जेट्टीजवळील सिडकोच्या प्रस्तावीत मैदानाच्या भूखंडावरील व खाडीकिनाऱ्यावरील वृक्षांची कत्तल केली जात आहे. पामबीच रोड व वनविभागाच्या हद्दीच्या मध्ये असलेल्या विस्तीर्ण भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा आहे. या परिसरात काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आंबा व इतर वृक्षांचीही लागवड केली असून त्यांची नियमीत काळजी घेतली जात आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये येथे काही वृक्ष तोडल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांचा ढिग रचण्यात आला आहे. खाडीकिनारी काही वृक्ष तोडल्याच्या खुणाही दिसत आहेत.

या परिसरामध्ये मद्यपी व गर्दुल्यांचा अड्डा तयार झाला आहे. रात्री येथे मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात. परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. गांजा व इतर अमली पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे कागदही पहावयास मिळत आहेत. मोकळ्या भूखंडावर डेब्रीजही टाकले जात आहे. पामबीच रोडवर महत्वाच्या परिसराच्या सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. वृक्ष तोडीविषयी माहिती घेण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर जागा सिडकोच्या अखत्यारीत असल्याची माहिती देण्यात आली.

खारफुटीलाही धोका
सद्यस्थितीमध्ये अद्याप प्रत्यक्षात खारफुटी तोडल्याचे दिसत नाही. परंतु खारफुटीला लागून असलेले काही वृक्ष तोडल्याच्या खुणा दिसत आहेत. यामुळे भविष्यात खारफुटीही तोडली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी व्यक्त केली नाराजी
या परिसरातील वृक्षतोडीच्या घटनांविषयी पामबीच रोडनजीकच्या इमारतीमधील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. काही दक्ष नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडेही तक्रारी केल्या असून पर्यावरणाचा ऱ्हास व असामाजीक तत्वांचा वापर थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण ढेबे यांनी  केली आहे.

Web Title: Navi Mumbai Incidents of unauthorized felling of trees in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.