नवी मुंबई विमानतळाचे ८ ऑक्टोबरला उद्घाटन; दीड ते दोन महिन्यांनी विमान वाहतूक सेवा होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:36 IST2025-10-05T07:34:52+5:302025-10-05T07:36:02+5:30
तब्बल ११६० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा पुरविण्याची क्षमता आहे. अंतिम टप्प्यात ती ९० दशलक्षपर्यंत वाढणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे ८ ऑक्टोबरला उद्घाटन; दीड ते दोन महिन्यांनी विमान वाहतूक सेवा होणार...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. ही घटना विकसित भारताच्या उत्तुंग झेपेचे प्रतीक ठरेल. महाराष्ट्राच्या आर्थिक शक्तीला नवे पंख लाभतील, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
हा विमानतळ देशातील सर्वांत मोठ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक ठरला आहे. तब्बल ११६० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा पुरविण्याची क्षमता आहे. अंतिम टप्प्यात ती ९० दशलक्षपर्यंत वाढणार आहे. यामुळे तीन वर्षांत १५ ते १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर पुढील दोन दशकांत हा आकडा एक लाखांवर जाईल. उद्योगधंदे, व्यापार, पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात नवी संधी निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञानाची कास
साडेतीन दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतुकीची तरतूद, दोन समांतर धावपट्ट्या, कमलपुष्पावर आधारित अद्वितीय वास्तुरचना, स्वयंचलित पीपल मुव्हर प्रणाली आणि भूमिगत नेटवर्कद्वारे जोडले जाणारे चार टर्मिनल्स यामुळे हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञानाचे द्योतक ठरेल.
डिसेंबरमध्ये पहिले व्यावसायिक उड्डाण
८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन होईल. त्यानंतर व्यावसायिक संचलनासाठी सुरक्षिततेची बाब म्हणून त्याचा ताबा सीआयएसएफकडे दिला जाईल. साधारण दीड ते दोन महिन्यांनी अर्थात डिसेंबरमध्ये येथून कार्गो आणि प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.