नवी मुंबई विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध; वाहतुकीसह कार्गो टर्मिनलची क्षमता वाढणार
By नारायण जाधव | Updated: October 11, 2025 07:47 IST2025-10-11T07:47:23+5:302025-10-11T07:47:59+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणाच्या टप्प्यात मुख्यतः येथील किनारी क्षेत्र, मँग्रोव्ह जंगले, जैवविविधता, पूर आणि समुद्रपातळी वाढ इत्यादी गोष्टी येऊ शकतात.

नवी मुंबई विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध; वाहतुकीसह कार्गो टर्मिनलची क्षमता वाढणार
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागले आहेत. यानुसार अदानी समूहाच्या नवी मुंबई विमानतळ कंपनीने विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाकडे सीआरझेड मंजुरीसाठी अर्ज केला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणाच्या टप्प्यात मुख्यतः येथील किनारी क्षेत्र, मँग्रोव्ह जंगले, जैवविविधता, पूर आणि समुद्रपातळी वाढ इत्यादी गोष्टी येऊ शकतात. यामुळे पर्यावरणीय संतुलन आणि स्थानिक हितसंबंधांचा विचार करून हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लागण्यासाठी सीआरझेड मंजुरी खूप गरजेची आहे. त्यानंतरच विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार असल्याचे बाेलले जात आहे.
ही कामे प्रामुख्याने करणार
विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत
सध्या उपलब्ध असलेल्या जमिनीव्यतिरिक्त आणखी किती
जमीन लागणार आहे, त्यातील किती भाग सीआरझेडमध्ये येतो, याबाबत तपासणी सुरू आहे.
प्राथमिक अंदाजानुसार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अतिरिक्त टर्मिनल्सची उभारणी, रनवे विस्तार आणि विमान वाहतूक सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे.
कार्गो केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तार करून अधिक कार्यक्षम सेवा प्रदान करण्यावर भर दिला जाणार आहे. विस्तारीकरणासाठी अपेक्षित गुंतवणूक कोट्यवधी रुपयांदरम्यान असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे.
अशी वाढणार क्षमता
विमानतळाची प्रवासी क्षमता सध्या वर्षाला ६ कोटी इतकी आहे. ही प्रवासी क्षमता वाढवून ९ कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. जेएनपीएचा विस्तार पाहता कार्गो हाताळणी क्षमतेतही १.५ दशलक्ष मेट्रिक टन वरून २.२५ दक्षलक्ष मेट्रिनपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
उड्डाणांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र
विस्तारीकरणाचे काम येत्या ३ ते ४ वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून हे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
विस्तारीकरणामुळे महामुंबईतील हवाई क्षेत्रातील भार कमी होण्यास मदत होईल. तसेच हे विमानतळाचा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र बनण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. आता सीआरझेड मंजुरी मिळाल्यानंतर काम त्वरित सुरू होण्याची शक्यता आहे.