नवी मुंबई विमानतळाचा विस्तार चार नव्हे, पाच टप्प्यात
By नारायण जाधव | Updated: October 21, 2025 09:02 IST2025-10-21T09:00:52+5:302025-10-21T09:02:30+5:30
सीआरझेड प्राधिकरणाने विस्तारीकरणाला अटी आणि शर्तींवर मंजुरी दिली.

नवी मुंबई विमानतळाचा विस्तार चार नव्हे, पाच टप्प्यात
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सागर किनारा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. सध्याच्या १,१६० हेक्टर क्षेत्रावरच विमानतळाचा हा विस्तार करण्यात येणार असला तरी तो चार नव्हे तर पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हे पाच टप्पे मिळून एक लाख कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
सीआरझेड प्राधिकरणाने विस्तारीकरणाला अटी आणि शर्तींवर मंजुरी दिली. या विस्तारामुळे प्रवासी क्षमता ६ कोटींहून वाढवून ९ कोटींपर्यंत आणि मालवाहतूक क्षमता १.५ दशलक्ष मेट्रिक टनांहून २.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पाला पर्यावरण राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या आवश्यक मंजुऱ्या २०१०मध्येच मिळाल्या आहेत.
खारफुटी सुरक्षित
कोविडमुळे मान्यतांची वैधता वाढविली असून, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता आणि उच्च न्यायालयाच्या खारफुटी तोडण्याच्या परवानग्याही मिळाल्या आहेत. नव्या विस्तारीकरणात जंगल संपत्ती किंवा खारफुटी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही, अशी माहिती विमानतळ कंपनी आणि त्यांच्या सल्लागारांनी या बैठकीत ‘सीआरझेड’ला दिली आहे.
विस्तारीकरणात ही कामे करणार
नवी मुंबई विमानतळाचा हा विस्तार प्रकल्प महामुंबईतील भविष्यातील वाढत्या विमानसेवांचा भार सांभाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. विस्तारीकरणात अतिरिक्त टर्मिनल्सची उभारणी, रनवेंचा विस्तार आणि विमान वाहतूक सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह कार्गो केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तार करून लवकर आणि अधिक कार्यक्षम सेवा प्रदान करण्यावर भर दिला जाणार आहे. सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांसह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. उलवे नदीचा पुनर्विकास, खारफुटी संरक्षण आणि सद्यस्थितीत सुधारणा व पक्षी अधिवासांचे संरक्षण आणि पुनःस्थापन यावर भर
तळोजा, अलिबागमध्ये खारफुटीची भरपाई
सिडको आणि खारफुटी सेलने ३७० हेक्टर खारफुटी लागवड पूर्ण केली आहे. (खारफुटी सेलने ३१० हेक्टर आणि सिडकोने ६० हेक्टर) जुई आणि तळोजा खाडींमधील कोल्हेखर गावात अतिरिक्त १०८ हेक्टर खारफुटी लागवड करून त्याला नो डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. अलिबाग विभागात ३५ हेक्टर निकृष्ट वनजमिनीवर वनीकरण कार्यक्रम राबवून ३८,८९६ रोपे लावली.