Meghalati, not the BJP's megharti; Chief Minister's torch | भाजपची मेगाभरती नव्हे, विरोधकांची मेगागळती; मुख्यमंत्र्यांचा टोला
भाजपची मेगाभरती नव्हे, विरोधकांची मेगागळती; मुख्यमंत्र्यांचा टोला

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षात मेगाभरती सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुळात पक्षाचा विकासाचा अजेंडा सर्वसामान्यांना पटल्याने विविध पक्षांतील लोक भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आमच्या पक्षात काय चालले आहे, यापेक्षा त्यांच्या पक्षातील मेगागळतीचा विचार करावा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला.

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्तृत्ववान नेते म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमचा अगोदरपासून डोळा होता, परंतु योग येत नव्हता. अखेर तो योग आल्याने नाईक हे आपल्या सर्व समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाईक यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेला आता राज्य सरकारचे इंजीन जोडले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईसह पनवेल शहराचा विकास करणे सोयीचे होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसह प्रलंबित अनेक प्रश्न सोडविण्यात गणेश नाईक यांची नक्कीच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भाषणे झाली. तर मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. दरम्यान, या वेळी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. या कार्यक्रमाला नवी मुंबईसह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील नाईक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्र माला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महापौर जयवंत सुतार, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, खासदार कपिल पाटील, किरीट सोमय्या, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, किसन कथोरे, आमदार नरेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.

‘खंत कायम राहील’
जनतेने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखविला. याच विश्वासाच्या बळावर पंधरा वर्षे मंत्री होतो. या काळात अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले, परंतु नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात यश आले नाही, याची खंत कायम राहील. असे असले तरी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता आपण भाजपची कास धरली आहे. पुढील काळात मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहून शहराचा विकास आणि जनतेची कामे जलदगतीने करणे शक्य होईल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: Meghalati, not the BJP's megharti; Chief Minister's torch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.