बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 03:05 IST2025-05-16T03:05:10+5:302025-05-16T03:05:59+5:30
पनवेलमधील कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला छडा

बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट भारतीय जन्मदाखला बनवून देणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. तसेच यापूर्वी अटक झालेल्या बांगलादेशी नागरिकाच्या आई व भावाला भाईंदर येथून अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ५ मे रोजी पनवेलच्या करंजाडे परिसरात छापा टाकून पाच बांगलादेशींना अटक केली होती. त्यावेळी तिघांकडे भारतीय पासपोर्ट सापडला होता. ही बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या मोहम्मद इस्माईल अमीन्नोदीन येरुलकर (५२) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता या प्रकरणात थेट कर्नाटकमधील धागेदोरे समोर आले. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी उपनिरीक्षक सरिता गुडे, सहायक निरिक्षक योगेश देशमुख, अलका पाटील, आदींचे पथक केले. त्यांनी कर्नाटकच्या कलबुर्गी परिसरात छापा टाऊन इस्माईल शब्बीर मिया शेख याला अटक केली. त्याने त्या तीन बांगलादेशींना बनावट जन्मदाखला बनवून दिला होता. त्या आधारे बांगलादेशींनी ते भारतीय असल्याचे सिद्ध करून भारतीय पासपोर्ट बनवला. त्यावरून या दोघांनी इतरही अनेक बांगलादेशींना भारतीय असल्याचा पुरावा बनवून देण्यात मदत केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेलच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाच्या माहितीवरून त्याचा भाऊ राहुल उर्फ मिकाईल गाझी व आई सुफियाबेगम गाझी यांना भाईंदरमधून अटक करण्यात आली आहे. सुफियाबेगम हिच्यावर मुंबई पोलिसांनी २०१२ मध्ये गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने तिचा अजामीनपात्र वॉरंट देखील काढला होता. मात्र, ती पोलिसांना सापडलेली नव्हती.