वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:33 IST2025-09-28T10:31:50+5:302025-09-28T10:33:15+5:30
सुरक्षा कठडा नसल्याने बेलापूर (ध्रुवतारा) जेट्टीवरून एक दुचाकी थेट खाडीत पडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
नवी मुंबई : सुरक्षा कठडा नसल्याने बेलापूर (ध्रुवतारा) जेट्टीवरून एक दुचाकी थेट खाडीत पडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये एक जण वाहून गेला असून, दुसऱ्या तरुणाला वाचविण्यात यश आले. याच ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी एक भरधाव कार खाडीत पडली होती.
बेलापूर येथील खाडी पुलाखालून जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची माहिती नसल्याने अनेक जण रस्ता चुकतात. हीच चूक रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या जिवावर बेतते.
जेट्टीवरून दुचाकी खाडीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांची चौकीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रेस्क्यू टीमच्या मदतीने श्रेयस जाेग (२३) याला तरुणाला खडीतून बाहेर काढले. मात्र, दुचाकी चालक अथर्व शेळके (२३) हा वाहून गेला. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता.
श्रेयश आणि अथर्व हे ऐरोलीत आयटी कंपनीत कामाला असून, श्रेयस हा ऐरोलीत तर अथर्व पनवेलला राहतो. खाडी पुलावरून जाण्याऐवजी ते पुलाखालील मार्गाने गेल्याने त्यांची दुचाकी जेट्टीवरून खाडीत पडली. २५ जुलैला मुंबईतील एक तरुणी कारने उलवेत जात असताना अशाच प्रकारे रस्ता चुकल्याने तिची कार जेट्टीवरून खाडीत पडली होती. त्यावेळी खाडीत पाणी कमी असल्याने आणि कारचा मागचा दरवाजा उघडल्याने तिचे प्राण वाचले. जुलैमधील कार अपघातानंतरही बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टीकडे जाणारा रस्ता सुरूच राहिल्याने हा दुचाकीचा अपघात झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
दोघे जण शनिवारी पहाटे दुचाकीवरून पनवेलकडे जात असताना त्यांची दुचाकी जेट्टीवरून खाडीत पडली. ते पुलावरून जाण्याऐवजी पुलाखालील रस्त्याने गेले. त्यामुळे हा अपघात घडला. त्यामध्ये एकाला वाचवण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. -अरुण पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सीबीडी