लोकमत इफेक्ट! ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई; वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:50 PM2020-10-16T23:50:52+5:302020-10-16T23:51:08+5:30

२२ वाहनांना दंड, वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहतुकीसाठी रस्ते खुले झाले असून, नागरिकांनीही  समाधान व्यक्त केले आहे. 

Lokmat effect! Action on vehicles in ‘no parking’; Special operation of traffic police | लोकमत इफेक्ट! ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई; वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम 

लोकमत इफेक्ट! ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई; वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम 

Next

नवी मुंबई :  नवी मुंबई शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. बेकायदा पार्किंगमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून, नो पार्किंग घोषित केलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवित नेरुळ सेक्टर ४ येथे बेकायदेशीररीत्या पार्किंग केलेल्या सुमारे २२ वाहनांवर कारवाई केली आहे.  

बेकायदा पार्किंगबाबत ‘लोकमत’ने गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. नेरुळ सेक्टर ४ येथे ग्रेट इस्टन गॅलरी या इमारतीमध्ये विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असून, इमारतीच्या आवारातील अपुऱ्या वाहन पार्किंगमुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या वाहने पार्किंग केली जातात. वाहतूककोंडी टाळण्यासाठी या परिसरातील रस्त्यांवर नो पार्किंग घोषित करण्यात आला आहे, परंतु वाहनचालक या नियमांचे उल्लंघन करून वाहने पार्किंग करीत असल्याने, इतर नागरिक आणि वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. 

या वृत्ताची तत्काळ दखल घेत, सीवूड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अशोक देवकाते, नितीन वडाळ, भरत गिरणारे यांनी विशेष मोहीम राबविली. या परिसरातील नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे २२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहतुकीसाठी रस्ते खुले झाले असून, नागरिकांनीही  समाधान व्यक्त केले आहे. 

पालिकेने लावले आहेत नो पार्किंगचे फलक

नवी मुंबई शहरात वर्दळीच्या ठिकाणी वाहतूककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, वाहनचालकांना याबाबत माहिती व्हावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नो पार्किंगचे फलकही बसविण्यात आले आहेत, परंतु वाहनचालकांकडून या नियमाचे उल्लंघन होत असून, यामुळे वर्दळीच्या परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते आहे. शहरात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहने पार्किंगचे नियोजन अपुरे असल्याने वाहने पार्किंगचा ताण परिसरातील रस्त्यांवर पडत आहे. 

Web Title: Lokmat effect! Action on vehicles in ‘no parking’; Special operation of traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.