अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 05:31 IST2025-10-07T05:30:53+5:302025-10-07T05:31:13+5:30
ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातामध्ये ट्रकचालकाचे अपहरण करून पुणेत डांबून ठेवल्याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, बाउन्सर प्रफुल साळुंखे यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अपहरण केले मात्र चांगले खायला दिले असे अनेक अजब दावे करून अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या दिलीप खेडकर यांना जामीन मिळवण्याचा प्रयत्न वकिलाकडून बेलापूर कोर्टात झाला. मात्र, खेडकर यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कोर्टापुढे मांडून अधिक तपासासाठी त्यांची अटक महत्त्वाची असल्याची भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली. त्यानुसार दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बुधवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.
ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातामध्ये ट्रकचालकाचे अपहरण करून पुणेत डांबून ठेवल्याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, बाउन्सर प्रफुल साळुंखे यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर दिलीप व प्रफुल यांच्या अटकेसाठी रबाळे पोलिस चतु:श्रुंगी येथे गेले असता दिलीप यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना अडथळा केल्याने त्यांनाही गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. दरम्यान, मनोरमा यांना १३ ऑक्टोबरपर्यंतचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिलीप खेडकर यांच्याही जामिनासाठी अर्ज केला आहे.
रात्री महिलांना पोलिस ठाण्यात बोलावले जात नसतानाही जामीन मिळताच मनोरमा ह्या शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. परंतु, पोलिसांनी रविवारी त्यांना बोलावले असता त्या हजर झाल्या नाहीत. यावरून पोलिसांना अडचणीत टाकण्याची त्यांची धडपड सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यायालयात काय घडले?
अपहरण झालेल्या चालकाला आपण चांगले जेवण दिल्याने त्याचा छळ झाला नसल्याचे सांगितले. मात्र, खेडकर दाम्पत्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे रबाळे पोलिसांनी न्यायालयात सांगून त्यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा दाखला दिला. शिवाय अपहरणाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डिव्हीआर गायब करणे, गुन्ह्यावेळी वापरलेले मोबाइल लपवून ठेवणे ही गुन्हेगारी प्रवृत्तीची लक्षणे असल्याने त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे हे शोधण्यासाठी त्यांचा फोन महत्त्वाचा धागा असल्याचीही भूमिका मांडली.